नागपूर : 58 कोटी रुपयांची फसवणूक करुन दुबईला (Dubai) पळून गेलेला, ज्याच्या घरातून तब्बल 12 किलो सोनं, 294 किलो चांदी आणि सुमारे 17 कोटींची रोख रक्कम मिळाली होती, तो अनंत उर्फ सोंटू जैन (Anant Jain) दुबईमधून पळून जाण्याचा तयारीत आहे का? अशी शंका निर्माण झाली आहे. कारण 19 जुलै रोजी एक महिन्याच्या पर्यटक व्हिसावर (Tourist Visa) दुबईला पळून गेलेल्या सोंटू जैनने त्याचा पर्यटक व्हिसा 14 ऑक्टोबरपर्यंत वाढवल्याची माहिती आहे. तसेच ज्या देशात भारताचा व्हिसा लागत नाही अशा देशात पळून जाण्याची त्याची तयारी असल्याची माहिती आहे. त्यामुळे केंद्रीय गृह विभाग आणि परराष्ट्र व्यवहार विभागाच्या मदतीने सोंटू जैनला भारतात परत आणण्याची वल्गना करणाऱ्या नागपूर पोलिसांचे (Nagpur Police) दावे फोल ठरत असल्याचा चित्र आहे.


गोंदियातील घरात सोनं, चांदी, रोख रक्कम सापडली


सोंटू जैनवर नागपुरातील एका व्यापाऱ्याची ऑनलाईन गेमिंगमध्ये 58 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणासंदर्भात नागपूर पोलिसांनी 22 जुलै रोजी गोंदिया येथे सोंटू जैनच्या घरी धाड टाकून तब्बल 16 कोटी 89 लाखांची रोकड, 12 किलो 403 ग्रॅम सोनं आणि 294 किलो चांदी असा 27 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. नंतर गोंदियामधील काही बँक लॉकरमधूनही 4.54 कोटी रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली होती.


व्हिसाची गरज नसलेल्या देशात पळून जाण्याच्या तयारीत


एक महिन्याचा पर्यटक व्हिसा संपल्यानंतर सोंटूला भारतात परतातच अटक करण्याचे नागपूर पोलिसांचे मनसुबे होते. त्यासाठी लूकआऊट नोटीसही काढण्यात आली होते. मात्र पर्यटक व्हिसा संपण्याच्या आधीच सोंटूने आपला व्हिसा पुन्हा एक महिन्यासाठी वाढवला आहे आणि तो दुबईमधून श्रीलंका किंवा ज्या देशांमध्ये भारतीय नागरिकांना व्हिसाची गरज नाही, अशा देशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.


ऑनलाईन गेमच्या माध्यमातून 58 कोटींची फसवणूक


सोंटू जैनने ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून नागपुरात स्थायिक झालेल्या एका मोठ्या तांदूळ व्यापाऱ्याच्या तरुण मुलाची तब्बल 58 कोटी रुपयांनी फसवणूक केली होती. ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून झटपट कोट्यवधी रुपये कमवण्याचे स्वप्न दाखवून ही फसवणूक करण्यात आली होती. त्याने अशाच पद्धतीने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. हे प्रकरण उघडकीस येऊन दोन आठवडे उलटले तरी अजूनही सोंटू दुबईतच आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सोंटू जैनचं स्वतःचं गेमिंग ॲप होतं आणि त्याच्या माध्यमातून तो ॲप नियंत्रित करुन खेळणाऱ्याचा विजय किंवा पराभव नियंत्रित करत होता. 


हेही वाचा


Nagpur Online Fraud : आधी 17 कोटींची रोकड, सोनं, चांदी जप्त; आता साडेचार कोटींचं सोनं ताब्यात, आरोपीच्या लॉकरमध्ये घबाड