गोंदिया : शेत कुंपणातून विद्युत करंटने मृत्यू हा निष्काळजीपणा, असा निर्वाळा देत मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठाने गोंदिया (Gondia) इथल्या शेतकऱ्यांची सदोष मनुष्यवधाच्या (Culpable Homicide) गुन्ह्यातून मुक्तता केली आहे. शेतातील कुंपणातून वीज प्रवाह सोडल्यामुळे एकाचा मृत्यू झाल्याने न्यायालयाने शेतकऱ्याला दोषी ठरवत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. यावर शेतकऱ्याने न्यायालयात धाव घेतली होती, त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने त्याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातून मुक्त करत हा निष्काळजीपणाचा गुन्हा असल्याचा निर्वाळा दिला आहे. यामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे. त्याचवेळी याप्रकरणातील दंड मात्र कायम ठेवला.


जनावरांपासून पिकाचं संरक्षण होण्यासाठी तारेच्या कुंपणात वीज प्रवाह


गोंदिया तालुक्यातील नवाटोला इथल योगराज आत्माराम रहांगडाले (वय 45 वर्षे) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. तर उमाशंकर सव्वालाखे असे मृताचे नाव होते. मृत गोंदिया तालुक्यातील सावरीटोला येथील रहिवासी होता. शेतातील पिकाचे जनावरांपासून संरक्षण होण्यासाठी रहांगडाले यांनी शेतीला असलेल्या तारेच्या कुंपणात वीज प्रवाह सोडला होता. सव्वालाखे हे शेतात गेले त्यावेळी त्यांचा स्पर्श वीज प्रवाहित कुंपणाला झाला. वीजेचा जोरदार धक्का बसल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. 2010 मध्ये ही घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. 


सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातून मुक्त करत निष्काळजीपणाचा गुन्हा असल्याचा निर्वाळा


28 मार्च 2016 रोजी सत्र न्यायालयाने शेतकरी रहांगडाले यांना दोषी ठरवत सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात 10 वर्षे सश्रम कारावास आणि 10 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात योगराज रहांगडाले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील दाखल केले होते. अखेर त्यांना या प्रकरणात दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने रहांगडाले यांना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातून मुक्त करत हा निष्काळजीपणाचा गुन्हा असल्याचा निर्वाळा दिला आहे.


हेही वाचा


Gondia : गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरने गळफास घेऊन जीवन संपवलं, कारण अद्याप अस्पष्ट