गडचिरोली : गडचिरोलीमधील (Gadchiroli) उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोमकें बेडगाव हद्दीतील बेडगाव घाट जंगल परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. माओवाद्यांनी (Naxalist) जमिनीत पुरुन ठेवलेली शस्त्रास्त्रे यावेळी पोलिसांनी जप्त केली आहेत. पोस्टे पुराडा येथील पोलीस पथकाने नक्षलिवरोधात अभियान राबवताना कोरची आणि टिपागड येथील पोलीस दलाला हानी पोहचवण्याचे प्रयत्न नक्षलवाद्यांकडून करण्यात येत होते. नक्षलवाद्यांचा हाच डाव पोलिसांनी उधळून लावला. माओवाद्यांनी बेडगाव घाट जंगल परिसरात स्फोटके आणि इतर साहित्य पुरुन ठेवलं असल्याची माहिती यावेळी पोलिसांना मिळाली.
स्फोटकांची माहिती मिळताच पोलिसांनी डिएसएमडी उपकरणाद्वारे जंगल परिसरात शोध मोहीम सुरु केली. त्यावेळी पोलिसांना एक संशयित जागा सापडली. त्या जागेचे बीडीडीएस पथक पाहणी केली. त्यानंतर अंदाजे दिड ते दोन फुट जमिनीमध्ये स्फोटक पदार्थ भरुन ठेवलेली पिशवी पोलिसांना सापडली. त्यामधील स्फोटकांची पुढील चौकशी केली जात आहे. तर यामुळे नक्षलवाद्यांचा एक मोठा कट उधळून लावण्यास गडचिरोली पोलिसांना यश आल्याचं सांगण्यात येत आहे.
माओवाद्यांकडून विलय सप्ताह साजरा करण्यात येतो. याकाळात माओवादी शासनविरोधी विविध घातपाती कारवाया करण्यासाठी प्रयत्न करत असतात. यावेळी माओवाद्यांकडून विविध प्रकारच्या शस्त्रांचा आणि स्फोटकांचा वापर करण्यात येतो. सुरक्षा दलाल अडचणीत टाकण्यासाठी माओवाद्यांकडून ही शस्त्रास्त्रे जमिनीमध्ये पुरुन ठेवली जातात. अशा हत्यांरांचा वापर मओवाद्यांकडून विविध नक्षली हालचाली करताना केला जातो. याच विलय सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
नक्षलवादी संजय रावला अटक केली होती
मागील दोन ते तीन वर्षांपासून संजय राव याच्याकडे पश्चिम घाट विभागाची कमांडर म्हणून जबाबदारी होती. त्याला काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये अटक करण्यात आली असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून देण्यात आली होती. त्यामुळे केंद्र सरकारने बंदी घातलेल्या माओवादी संघटनेला मोठा धक्का बसला होता. पश्चिम घाटाचा कमांडर म्हणून संजय राव कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू मधील नक्षली कारवायांकडे लक्ष घालत होता. तसेच तो माओवादी पक्ष संघटनेत महत्त्वाच्या असणाऱ्या केंद्रीय समितीचा सदस्य होता.
मागील काही काळात माओवादी चळवळीला धक्के बसत आहेत. केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून माओवाद्यांची कोंडी करण्याचे काम सुरू आहे. त्याचा परिणाम माओवादी चळवळीवर होत आहे. तर गडचिरोलीमध्ये करण्यात आलेल्या या कारवाईमुळेही माओवाद्यांना मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे.