नागपूर: केंद्र सरकारने बंदी घातलेल्या माओवादी संघटनेला (CPI-Maoist) मोठा झटका बसला आहे. माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा केंद्रीय समितीचा सदस्य आणि जहाल नक्षलवादी कमांडर संजय राव उर्फ विजय याला हैदराबादमध्ये अटक करण्यात आली असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. संजय राव हा मूळचा महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथचा रहिवाशी  आहे. मागील अनेक वर्ष तो नक्षलवादामध्ये सक्रिय आहे.


मागील काही काळात माओवादी चळवळीला धक्के बसत आहेत. केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून माओवाद्यांची कोंडी करण्याचे काम सुरू आहे. त्याचा परिणाम माओवादी चळवळीवर होत आहे. 


गेले दोन-तीन वर्षांपासून संजय राव याच्याकडे पश्चिम घाट विभागाचा कमांडर म्हणून जबाबदारी होती. पश्चिम घाटाचा कमांडर म्हणून तो कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू मधील नक्षली कारवायांकडे लक्ष घालत होता. तसेच तो माओवादी पक्ष संघटनेत महत्त्वाच्या असणाऱ्या केंद्रीय समितीचा सदस्य होता. 


महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश मधील एमएमसी झोनमध्ये नक्षलवादी कारवायांची जबाबदारी सांभाळणाऱ्या मिलिंद तेलतुंबडे हा पोलीस चकमकीत ठार झाला होता. त्यानंतर संजय रावकडे एमएमसी झोनची जबाबदारी दिली जाणार होती. मात्र त्यापूर्वीच तेलंगणा पोलिसांनी हैदराबादमध्ये संजय राव याला अटक केल्याची माहिती आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांना एक मोठा झटका लागला आहे.


संजय रावला यापूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा मध्येही नक्षली कारवायासंदर्भात अटक झाल्याची माहिती आहे. 


दरम्यान, काही दिवसांपूर्वीच तीन दशकांपासून गुंगारा देणारा जहाल नक्षलवादी अशोक रेड्डी याला मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली. तीन दशकांपूर्वी तेलंगणामधून येऊन महाराष्ट्रात नक्षलवादाचे बी रोवणाऱ्या, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांसह मध्यप्रदेशातील बालाघाट क्षेत्रात नक्षलवादाची मुहूर्तमेढ करणाऱ्या जहाल नक्षल कमांडर अशोक रेड्डी उर्फ मुरली उर्फ कुशनाम उर्फ महेश याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये मध्यप्रदेश एटीएसने अशोक रेड्डी आणि त्याची पत्नी रहमतीला अटक केली आहे. अशोक रेड्डीवर महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये लाखो रुपयांचे बक्षीस होते.


काही दिवस विजनवासात राहिलेला अशोक रेड्डी नंतर नक्षलवाद्यांचा गड मानल्या जाणाऱ्या अबुजमाड परिसरात दिसून आला. गेली काही वर्षे अशोक रेड्डी सातत्याने अबुजमाडमध्ये राहून नक्षल कारवाया करत होता. तसेच त्याने तिथे नक्षलवाद्यांच्या लढ्यासाठी स्फोटकं आणि इतर शस्त्र निर्मितीचे काही अड्डे (कारखाने) तयार केल्याची पोलिसांची माहिती आहे. 


ही बातमी वाचा: