Gadchiroli Rain : गडचिरोली जिल्ह्यात पावसानं कहर केला आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळं एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रवासी घेऊन जाणारा ट्रक पुरात वाहून गेल्याची घटना घडली आहे. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. 3 जणांचे मृतदहे सापडले आहेत. हा ट्रक आलापल्लीवरुन भामरागडला जात होता, त्यावेळी ट्रक पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. अहेरी तालुक्यातील पेरमिली गावाजवळ ही घटना घडली आहे.


SDRF च्या  टीमची शोध मोहीम सुरु


ट्रक आलापल्लीवरुन भामरागडला जात होता. त्यावेळी अहेरी तालुक्यातील पेरमिली गावाजवळ एका नाल्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. पुलावरुन पाणी जातं असल्याने हा मार्ग बंद करण्यात आला होता. मात्र, पुलावरील पाणी ओसरु लागल्याचं बघून ट्रक ड्रायव्हरने गाडी पुढे घेतली. मात्र, मध्यभागी पोहोचल्यावर लाकूड अडकल्यानं ट्रक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही घटना मध्यरात्रीची असून, घटनेची माहिती मिळताच आज सकाळी SDRF च्या  टीमने शोध मोहीम राबवण्यास सुरुवात केली. दरम्यान 3 मृतदेह मिळाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे, अजून गाडीत प्रवासी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 




राज्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी 


राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकरी आनंदी असल्याचे दिसत आहे. राज्यातील मुंबईसह, ठणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही चांगला पाऊस सुरु असल्याचं दिसत आहे. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळं नदी नाले धुथडी भरुन वाहत असल्याचं चित्र दिसत आहे. तसेच कोकणात देखील चांगला पाऊस पडत आहे. राज्यात काही ठिकाणी सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. नदी नाल्यांना काही ठिकाणी पूर आले आहेत. तर मराठवाड्यात या पावसामुळं शेतीचं देखील मोठं नुकसान झालं आहे. हजारो हेक्टरवरील पीकं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: