गडचिरोली (रोहित टोम्बारलवार): यंदाच्या आयपीएलमधील 46 मॅच पार पडल्या आहेत. आयपीएल सुरु असताना काही जण वेगवेगळ्या मार्गांनी पैसे कमावण्याचा प्रयत्न करत आहेत. एका बनावट अ‍ॅपच्या माध्यमातून आयपीएल मॅचेसच्या दरम्यान सट्टा लावला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीनुसार गडचिरोली पोलिसांनी विशेष मोहीम राबवून अहेरी येथील बालाजी गेस्ट हाऊस येथे छापा मारला. या छाप्यात बनावट अ‍ॅपद्वारे सट्टा लावणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे.  


अहेरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आयपीएल सट्टा खेळवणाऱ्या बुकींबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती.  यानंतर पोलिसांनी विशेष मोहीम राबवून अहेरी येथील बालाजी गेस्ट हाऊस येथे छापा मारला. बनावट नाईसी 7777 फन अशा बनावट प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन आयपीएल क्रिकेटवर सट्ट्याचा खेळ खेळून लोकांना त्यांवर पैसे लावण्यास भाग पडून, नशीब आजमवण्यास भाग पाडलं जात असल्याचं समोर आलं. 


चौघांना अटक


पोलिसांनी या प्रकरणी छापा टाकलेल्या ठिकाणावरुन निखील दुर्गे आणि आसिफ शेख यांच्या ताब्यातून चार मोबाईल फोन आणि  9420 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी या आरोपींना विश्वासात घेत चौकशी केल्यानंतर आणखी काही गोष्टी समोर आल्या आहेत.   इरफान ईकबाल शेख रा. अहेरी आणि  संदिप गुडपवार रा. आल्लापल्ली हा रॅकेट चालवत असल्याचं समोर आलं आहे. आय.पी.एल क्रिकेट बेकायदेशीरपणे ऑनलाईन सट्टयाचा जुगार चालवणाऱ्यांमध्ये निखील दुर्गेे, आसिफ शेख हे व्यक्ती एजंट म्हणून काम करत असल्याचं समोर आले. याशिवाय निखील गुंडावार, प्रणित श्रीरामवार, अक्षय गनमुकलवार, फरमान शेख, फरदिन पठाण हे देखील सट्टयांमध्ये एजंटचे काम करत असल्याचं समोर आलं आहे.


पोलिसांनी  निखील मल्लया दुर्गेे, आसिफ फकीर मोहम्मद  शेख, धंनजय राजरत्नम गोगीवार, निखील गुंडावार, प्रणित श्रीरामवार,  अक्षय गनमुकलवार,  फरमान शेख, फरदिन पठाण,  इरफान ईकबाल शेख सर्वजण राहणार अहेरी आणि संदिप गुडपवार रा. आल्लापल्ली यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन अहेरी येथे महाराष्ट्र जुगार बंदी कायदा कलम 4 व 5 कायदयान्वये गुन्हा नोंंद करण्यात आला आहे.


गडचिरोली पोलिसांनी संपूर्ण जिल्हयातील नागरिकांनी अशा प्रकारच्या अवैध सट्टेबाजी पासून दूर राहावं, असं आवाहन केलं.  कोणी अशाप्रकारचे अवैध व्यवसाय चालवत असल्यास त्यांची माहिती पोलीस विभागाला देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी केले आहे.


संबंधित बातम्या :


 शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरलानंतर भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, नाशिकच्या जागेवर...


 Pankaja Munde : माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहचवण्यापासून मला कोणीच रोखू शकत नाही; भर पावसातल्या सभेत पंकजा मुंडेंचा हुंकार