Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत (Mahayuti) जोरदार रस्सीखेच सुरु असतानाच मोठा ट्विस्ट आला आहे. शांतीगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज नाशिकमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना शिंदे गटाकडून (Shiv Sena Shinde Faction) त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.  यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्यासाठी प्रचंड जोर लावला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ हे देखील नाशिकमधून लोकसभा लढण्यास इच्छुक होते. मात्र भुजबळांनी काही दिवसांपूर्वीच निवडणुकीतून जाहीर माघार घेतली. त्यानंतर देखील राष्ट्रवादीने नाशिकच्या जागेचा दावा सोडलेला नाही. नाशिकच्या जागेसाठी दररोज नवनवीन इच्छुकांची नावे समोर येत आहेत. त्यातच शांतीगिरी महाराजांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून याबाबत छगन भुजबळांनी वक्तव्य केले आहे. 


नाशिकच्या जागेवर ज्याचे नाव जाहीर होईल, त्याचा प्रचार करणार - छगन भुजबळ 


छगन भुजबळ म्हणाले की, शांतिगिरी महाराजांचे काय ठरले हे माहिती नाही. ज्यांना उभे राहायचे आहे ते सगळ्यांची भेट घेतील.  आम्ही फॉर्म भरतोय सहकार्य करा, असे सगळेच म्हणत आहेत.  शिंदे, फडणवीस आणि अजित पवार तो प्रश्न बसून सोडवतील. नाशिकचे नाव जाहीर करतील. ज्याचे नाव येईल त्याचा प्रचार आम्ही करू. कोणी कितीही विरोधक, पाठीराखा असला तरी निवडणूक काळात भेट घेतातच. प्रत्येकाचा आदर करणे ही आपली संस्कृती असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच, नाशिकच्या जागेवरून तुम्ही नाराज असल्याने प्रचार करत नाहीत, असे विचारले असता भुजबळांनी बोलण्यास नकार दिला. 


काय म्हणाले शांतीगिरी महाराज ? 


एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पक्षाकडून आज फॉर्म भरला आहे. हा निर्णय आमच्या लोकसभा कमिटीने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांची मागे भेट घेतली होती. आमचे सगळे मुद्दे मुख्यमंत्र्यांनी शांततेने ऐकून घेतले. मुद्द्यांच्या आधारे आपण निर्णय नंतर करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जय बाबाजी भक्त परिवाराने विडा उचलला आहे की, या वेळेला लढायचं आणि जिंकायचं. पक्षाच्या  एबी फॉर्मबाबत आमचे वकील आणि भक्त परिवार ते निर्णय घेतील. निवडणुकीबाबत आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.


आणखी वाचा 


Aniket Shastri : भाजपकडून मलाच उमेदवारी! नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री यांचा दावा कायम, उमेदवारी अर्जही घेतला