Gadchiroli News : गडचिरोली (Gadchiroli) दुर्गम भागातील पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस हवालदाराला (Police Constable) हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तत्परता दाखवत त्याला हेलिकॉप्टरच्या (Helicopter) मदतीने नागपूरमधील (Nagpur) रुग्णालयात दाखल केले. मात्र पोलीस विभागाचे प्रयत्न शेवटी अपुरेच पडले. तीन दिवसानंतर त्या पोलीस हवालदाराचे अखेर निधन झालं. रमेश बहिरेवार (वय 43 वर्ष) असं मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. रमेश बहिरेवर हे गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील ठाकरी इथले रहिवासी असून मुलचेरा पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते.
रमेश बहिरेवार यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला
रमेश बहिरेवार यांना 9 डिसेंबर रोजी हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. मुलचेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक भापकर यांनी रमेश बहिरेवार यांना उपचारांसाठी मुलचेरा इथल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. तपासणीनंतर पुढील उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यास सांगितलं. पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी गडचिरोली इथल्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी हालचाली केल्या. परंतु रमेश बहिरेवार यांच्या वेदना पाहता त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणं शक्य नव्हतं. यावेळी ठाणेदार अशोक भापकर यांनी प्रसंगावधान दाखवत जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पन यांना संपर्क केला आणि परिस्थितीची माहिती दिली.
रुग्णाला घेऊन हेलिकॉप्टरने नागपूरच्या दिशेने उड्डाण केलं
पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस दलासाठी असलेलं हेलिकॉप्टर मुलचेराला पाठवण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी हेलिपॅडजवळ बंदोबस्त लावला. रमेश बहिरेवार यांना स्ट्रेचरवरुन हेलिपॅडजवळ आणलं. बहिरेवार यांची प्रकृती पाहता वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्यांनानागपूरमधील रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर गडचिरोली पोलीस दलाचं हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरलं. त्यांना चॉपरमध्ये घेण्यात आलं आणि हेलिकॉप्टरने नागपूरच्या दिशेने उड्डाण केलं.
वरिष्ठ अधिकाऱ्याकडून प्रयत्नांची पराकाष्ठा, पण...
नागपूरमधील ऑरेंज सिटी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. परंतु उपचार सुरु असताना तिसऱ्याच दिवशी (12 डिसेंबर) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गडचिरोली या आदिवासी बहुल दुर्गम जिल्ह्यात मूलभूत सोयी-सुविधांची अजूनही वानवा आहे. पोलीस हवालदाराला कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा झटका आल्याने तो सुखरुप राहावा यासाठी गडचिरोली पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु रमेश बहिरेवार यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवल्याने अधिकाऱ्यांचे हे प्रयत्न अपयशी ठरले. बहिरेवार यांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तर एवढे प्रयत्न करुनही बहिरेवार यांचं निधन झाल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान रमेश बहिरेवार यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.