Gadchiroli News: छत्तीसगड राज्यातील (chhattisgarh sukma naxal news) सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पीएलजीए (Naxal PLGA celebration )सप्ताहाच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये गणवेशधारी नक्षलवादी उपस्थित असल्याचं दिसत आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने गावकरीही सहभागी झाल्याची माहिती आहे. हा व्हिडीओ बीजापूर आणि सुकमा या सीमावर्ती भागातील जंगलातील असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र नेमका कुठला आहे हे समजू शकलेले नाही.
नक्षल्यांकडून 2 ते 8 डिसेंबरपर्यंत पीएलजीए सप्ताह संपूर्ण दंडकारण्यात साजरा करण्याचं आव्हान केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर नक्षल्यानी मोठं प्रमाणात हा सप्ताह साजरा केल्याचे दिसून येत आहे. दृश्यात दोन रांगेत मोठ्या संख्येत नागरिक रांगेत नारे देत जात असतांना दिसत आहेत. तर कार्यक्रमस्थळी क्रांतीकारी गाण्यावर नाचताना नक्षली पुरुष आणि महिला दिसत आहेत, सोबत बंदूकधारी नक्षल देखील दिसत आहेत. दरम्यान नृत्य करणारे नक्षली आहेत की नागरिक याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
असे कार्यक्रम नक्षलवादी नेहमी करत असतात. ज्यात महिला दिन हा कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणात साजरा करतात. त्यात दंडकारण्यात असलेले नक्षलग्रस्त दुर्गम भागातील गावांतील नागरिकांना बोलावण्यात येते. या कार्यक्रमांना गावकरी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात.
ज्या भागात नक्षली कार्यक्रमाचं आयोजन करतात तो संपूर्ण भाग हा घनदाट जंगलाने व्यापलेला असतो. दुर्गम, डोंगराळ आणि जिथे पोलीस यंत्रणा सहज पोहोचू शकत नाही, अशा भागाची या कार्यक्रमांसाठी निवड केली जाते. नक्षल्यांकडून याबाबत कमालीची सतर्कता बाळगली जाते.
दुसरीकडे इतक्या मोठ्या संख्येत गावकरी कार्यक्रमात उपस्थित असतात की पोलीस यंत्रणा नक्षल्यावर गोळीबार किंवा दुसरी कार्यवाही करू शकत नाही. हे गावकरीच नक्षल्यांसाठी प्रोटेक्शनच काम करतात. त्यामुळे पोलिसांना माहिती झाली तरी ते काही करू शकत नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
असे अनेक कार्यक्रम किंवा जनअदालतचे आयोजन आधी संपूर्ण दंडकारण्यात सहज होत होते. मात्र सुरक्षा बलाचा वाढता दबाव आधुनिक तंत्रज्ञान यामुळे मोजक्या जागी असे कार्यक्रम आता होत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात असे कार्यक्रम व्हायचे मात्र आता हे प्रमाण संपलं आहे. गडचिरोली पोलिसांचा वाढता दबाव, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ज्यात गडचिरोली पोलिसांकडे ड्रोन, आधुनिक हत्यारे, हेलिकॉप्टर सेवा देखील उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक चकमकीत मोठ्या नक्षल नेत्यांपासून अनेक मोठे नक्षली मारले गेलेत. तर अनेकांनी आत्मसमर्पण केलं आहे.