गडचिरोली : राज्यातील जनतेला व अत्यावश्यक गंभीर रुग्णाला तात्काळ रुग्णवाहिका (Ambulance) आणि वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करुन  देखील आजही  आदिवासी भागातील लोकांना याआधीही आरोग्य सेवा मिळावण्यासाठी संघर्ष करावा लागल्याचं पाहायला मिळालंय.  अचानक प्रकृती खालावल्यानंतर वेळेत रुग्णवाहिका (Gadchiroli News)   उपलब्ध न झाल्याने उपचाराअभावी चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दुर्गम भागात  राहणाऱ्या  लोकांना स्वातंत्र्यांच्या 77 वर्षानंतरही  मुलभूत सोयी सुविधांसाठी वंचित राहावं लागतंय, हे या घटनेतून पुन्हा  अधोरेखित झालंय.


समोर आलेल्या माहितीनुसार,  आर्यन अंकित तलांडी ( 4 वर्षे, रा. कोरेली ता. अहेरी) असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना 24  जून रोजीची असून तीन दिवसांनंतर उघडकीस आली. अहेरी तालुक्यातील कोरेली या दुर्गम येथील रहिवासी असलेले अंकित तलांडी यांच्या आर्यन या चार वर्षीय मुलाची 23 जून रोजी मध्यरात्री प्रकृती खालावली होती. त्याला पोटदुखीचा त्रास सुरू झाला. दरम्यान, मध्यरात्री पाच किमी लांब असलेल्या पेरमिली आरोग्य केंद्रात त्याला उपचारासाठी नेण्यात आले. त्यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आर्यनवर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर आर्यनला पालकांनी घरी कोरेलीला परत नेले. 24  जूनला पहाटे त्याला अधिक त्रास होऊ लागल्याने त्याला पुन्हा पेरमिली आरोग्य केंद्रात नेण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला अहेरी येथे नेण्यास सांगितले. 


पालकांनी रुग्णालय परिसरात एकच टाहो फोडला


अहेरी येथे नेण्यासाठी  वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने पालक आर्यनला घेऊन बसने अहेरीसाठी निघाले. दरम्यान, वाटेत त्याची प्रकृती अधिक खालावली. ही बाब बस चालक गौरव आमले यांना लक्षात येताच त्यांनी बस थेट आलापल्ली येथील आरोग्य केंद्रात नेली. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. यावेळी आर्यनसोबत त्याचे आजी व आजोबा होते. तर वडील दुचाकीने यायला निघाले होते. घरातील एकुलता एक मुलगा गेल्याने पालकांनी रुग्णालय परिसरात एकच टाहो फोडला होता. 


आदिवासीच्या जीवाची किंमत नाही का?


आरोग्य विभागाच्या ढिसाळ कार्यपद्धतीमुळे या भागात दरवर्षी अशा हृदयद्रावक घटना समोर येत असतात पण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे व्यवस्थेत सुधारणा होण्याऐवजी अधिकच बिघाड होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथील आदिवासीच्या जीवाची किंमत नाही का, असा प्रश्न विचारल्या जात आहे.


हे ही वाचा :


गृहमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्याविरुद्ध पत्रक, 'भगोडा गिरीधर' म्हणत दिला इशारा