Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा विभागाअंतर्गत येणाऱ्या उपपोस्टे दामरंचा पासून महाराष्ट्र- छत्तीसगड राज्याच्या सिमेपासून 10 किलोमीटर अंतरावर आत असलेल्या टेकामेटा जंगल परिसरात पोलीस-नक्षल चकमक झाली. यात 2 नक्षली टिपण्यात सुरक्षा दलांना यश आले तर 1 जखमी नक्षलीला अटक करण्यात आली. गोपनिय माहीतीवरुन गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाचे (सी-60) 300 जवान व डीआरजी पोलीस पथक छत्तीसगडचे २० जवान हे संयुक्त नक्षलविरोधी अभियान राबवित होते. जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवादयांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. चकमक ही सुमारे ३० ते ४५ मिनीटे चालू होती. चकमकीनंतर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता घटनास्थळावर १ महिला नक्षल व १ पुरुष नक्षल मृत अवस्थेत आढळले. मृत महिला नक्षलीची ओळख
कांती लींगच्या ऊर्फ अनिता, 41 वर्षे, रा. लक्ष्मीसागर, पोस्टे कडेम, जि. निर्मल राज्य तेलंगना अशी झाली आहे. ती सध्या डीव्हीसीएम (इंद्रावेली एरीया कमेटी) या पदावर कार्यरत होती. तीच्यावर महाराष्ट्र शासनाने १६ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच तेलंगना शासनाने पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. मृत महिला नक्षल ही मैलारापु अडेल्लु ऊर्फ भास्कर (तेलंगना राज्य समीती सदस्य व सचीव कुमारम भिम डिव्हीजन कमीटी) यांची पत्नी होती. या चकमकीत एक अनोळखी पुरुष नक्षल मृतदेह व जखमी अवस्थेत असलेले एक नक्षल मिळाले. जखमी नक्षलीचे नाव लचमया कृच्चा बेलादी चय 28 वर्षे, रा. टेकामेटा, छत्तीसगड असून तो सध्या जनमिलीशिया सदस्य म्हणून नक्षलवाद्याकरीता काम करत होता.
घटनास्थळावरुन 02 एसएलआर रायफल, 01 भरमार रायफल व मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले आहे. सदर जंगल परिसरात सी-६० पथकाचे जवान व डीआरजी पोलीस पथक यांचे संयुक्त नक्षलविरोधी अभियान आणखी सुरु असुन, जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहिम राबविण्यात येत आहे. गडचिरोली पोलीस दल व बीजापूर पोलीस यांनी पहील्यांदाच अतिदुर्गम भागात नक्षलविरोधी अभियान राबविले असून पुढील गुन्हा नोंद करण्यासंबंधीची प्रक्रिया सुरु असून पुढील तपास बीजापूर पोलीस यांचेकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे.
ही बातमी वाचाच: