गडचिरोली : छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवर बुधवारी झालेल्या पोलीस-नक्षलवादी चकमकीत महाराष्ट्राच्या विशेष दलाच्या C-60 कमांडोंनी 12 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नसली तरी जवानांनी घटनास्थळावरून 7 स्वयंचलित शस्त्रे जप्त केली आहेत. यापैकी जवानांनी तीन एके-47, दोन इन्सास आणि एक कार्बाइन तसेच एक एसएलआर जप्त केला आहे. या भागात गुरुवारी सकाळी शोधमोहीम राबवण्यात येणार आहे.


घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि नक्षलवाद्यांच्या दैनंदिन वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी या चकमकीत C-60 कमांडोचे उपनिरीक्षक सतीश पाटील यांच्या डाव्या खांद्यावर गोळी लागली असून ते गंभीर जखमी झाले आहेत. कांकेर जिल्ह्यातील पोलीस छावणीतून त्यांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने गडचिरोली येथील बांदा कॅम्प येथे नेण्यात आले आहे. सध्या या जवानाचे प्राण धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.


टिपागड नक्षलवादी गटाशी जवानांची चकमक


या चकमकीची माहिती देताना बस्तरचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी म्हणाले की, बुधवारी सकाळी 10.00 वाजता महाराष्ट्राच्या विशेष दलाच्या सी-60 कमांडोची आणि नक्षलवाद्याची जंगलाच्या मध्यभागी समोरासमोर चकमक झाली. नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात C-60 कमांडोचे उपनिरीक्षक सतीश पाटील यांच्या खांद्याला गोळी लागली, त्यामुळे ते जखमी झाले. यानंतर जवानांनी तात्काळ प्रतिक्रिया म्हणून नक्षलवाद्यांवर जोरदार गोळीबार केला. सुमारे तीन ते चार तास चाललेल्या या चकमकीत जवानांनी 12 नक्षलवाद्यांना ठार केले.


मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांवर लाखो रुपयांचे बक्षीस 


चकमक थांबल्यानंतर जवानांनी झडतीदरम्यान सर्व 12 नक्षलवाद्यांचे मृतदेह बाहेर काढले. महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या पोलिसांना माओवादी संघटनेचा डीव्हीसीएम कमांडर लक्ष्मण, विशालचा मृतदेह मिळाला. टिपागड नक्षलवादी दलम या भागात असल्याची माहिती मिळाली. यानंतर महाराष्ट्रातून सी-60 कमांडोकडून सर्च ऑपरेशन करण्यात आले.


DRG टीमने छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातूनही ऑपरेशन केले. त्या ठिकाणी C-60 कमांडो आणि महाराष्ट्रातील नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. घटनास्थळावरून ज्या प्रकारे 7 स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत, त्यावरून असा अंदाज वर्तवला जात आहे की मारले गेलेले सर्व नक्षलवादी मोठे नक्षलवादी नेते असून त्यांच्यावर लाखो रुपयांचे बक्षीस आहे.


जखमी उपनिरीक्षकावर उपचार सुरू


सध्या छत्तीसगड आणि महाराष्ट्राचे पोलीस ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवण्यात गुंतले आहेत. त्याचवेळी या चकमकीत जखमी झालेले पोलिस उपनिरीक्षक सतीश पाटील यांना तत्काळ महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील पोलीस छावणीत आणण्यात आले. त्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील बांदा येथे नेण्यात आले. नंतर नागपूरला रेफर करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


मुख्यमंत्र्यांची C60 युनिटच्या जवानांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलिस दलाच्या C60 युनिटच्या जवानांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली आहे. गडचिरोली पोलिस अधिक्षक निलोत्पल आणि स्पेशल IG संदिप पाटील तसेच C 60 युनिट प्रमुखांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून अभिनंदन केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र पोलिसांना गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त मुक्तं करण्याचे आदेश दिले आहेत.