गडचिरोली : अर्थमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki bahin yojana) योजनेची घोषणा केली. त्यानंतर, या योजनेचा राज्यभर गवगवा आणि चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून लाखो महिला भगिनींनी आपले ऑनलाईन अर्जही दाखल केले आहेत. तर, विविध जिल्ह्यात ऑफलाइनही अर्ज दाखल केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शासनाकडून ही योजना अधिक सुलभ करण्यात येत असून तांत्रिक अडचणीही दूर केल्या जात आहेत. त्यामुळेच, नारीशक्ती दूत अॅपवरुनही अर्ज सहजपणे भरणे शक्य होत आहे. त्यातच, रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर योजनेचा पहिला हफ्ता महिला भगिनींच्या खात्यात जमा होईल, अशी माहितीही राज्यकर्त्यांनी दिली. आता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही फायनल तारीख सांगितली आहे.  


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात आज विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा केली. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता कधी दिला जणार, यावर भाष्य करताना 15 ऑगस्टची तारीख सांगितली. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रक्षाबंधनाची भेट म्हणून लाडक्या बहि‍णींना योजनेतील हफ्त्याची रक्कम दिली जाईल, असे स्पष्ट केले. आता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता महिला भगिनींना कधी मिळणार, यासंदर्भात माहिती दिली. गडचिरोलीतील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्याबाबत स्पष्टच सांगितले. 


''आमचा हा प्रयत्न आहे की, 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट म्हणजे रक्षाबंधनाच्या निमित्ताने या योजनेचा पहिला टप्पा किंवा पहिला हफ्ता जमा होईल, त्यासाठी आम्ही निधी देणार आहोत. त्यामध्ये, दोन महिन्यांचा हप्ता देण्यात येणार आहे, म्हणजे प्रत्येक भगिनीला 3000 रुपये थेट बँक खात्यात जमा होतील. मात्र, जरी हा निधी 15 तारखेला देणार असलो तरीही, आम्ही यापूर्वीच घोषणा केलीय की 31 ऑगस्टपर्यंत ज्यांचे अर्ज येतील, ते अर्ज जुलै महिन्यातच आले असं समजलं जाईल. तसेच, त्यांनाही त्याच्या पुढच्या महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे देणार आहोत, त्यामुळे नुकसान कोणाचेच होणार नाही,'' असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. 


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रतेचे निकष काय? 


महाराष्ट्र रहिवासी 
विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल


अपात्र कोण असेल?


2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
घरात कोणी Tax भरत असेल तर
कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर (ट्रॅक्टर सोडून)


कोणती कागदपत्रं लागणार? 


आधारकार्ड
रेशनकार्ड
उत्पन्नाचा दाखला
रहिवासी दाखला
बँक पासबुक
अर्जदाराचा फोटो
अधिवासाचं प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र
लग्नाचे प्रमाणपत्र
योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपवर/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरलं जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.