Gadchiroli News : राज्य वनविभागाने गडचिरोलीमधून ( Gadchiroli) हरियाणातील बावरिया जमातीचे अकरा शिकारी आणि त्यांच्या अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. गडचिरोली शहरालगत असलेल्या आंबेशिवणी गावातून या शिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. देशभरात वनविभागाने राबविलेल्या यशस्वी मोहिमेमध्ये चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यातील वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ताब्यात घेतलेल्या या शिकाऱ्यांकडून वाघ शिकारीसाठी लागणारे मजबूत लोखंडी सापळे, वाघ नखे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. चंद्रपूर- गडचिरोली आणि तेलंगणा राज्यातील संभाव्य वाघ शिकारीला या धाडसी कारवाईने आळा घालण्यास मदत होणार आहे.
काय आहे प्रकरण?
आसाम राज्यातील गुवाहाटीमध्ये 28 जून 2023 रोजी पोलीस विभाग आणि वनविभागाने केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये वाघाची शिकार करण्याच्या प्रकणात हरियाणा राज्यातील बावरीया जमातीच्या तीन व्यक्तींना अटक करण्यात आली होती. या आरोपींकडून वाघाची कातडी आणि वाघाची हाडे ताब्यात घेण्यात आली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे नवी दिल्लीतील वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाराने सर्व प्रमुख व्याघ्र प्रकल्पांच्या सभोवतालच्या क्षेत्रांमध्ये वाघांची शिकार होण्याची शक्यत वर्तवली होती. त्यानंतर आसामच्या शिकाऱ्यांनी चंद्रपूर आणि गडचिरोली परिसरात शिकार केली होती. पण गुवाहीटीमधील शिकाऱ्यांना वनविभागाने ताब्यात घेतले. या संपूर्ण प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी आणि याबाबत अधिक गुप्त माहिती मिळवण्यासाठी तीन सदस्यांचे पथक गुवाहाटी येथे रवाना झाले.
या पथकाने गुवाहाटीमध्ये कारागृहात असलेल्या आरोपींची चौकशी केली असता त्यांच्या टोळीतील काही माणसं गडचिरोमध्ये असल्याची माहिती समोर आली होती. या गुप्त माहितीच्या आधारे वनविभाग आणि पोलिसांनी सर्व संशयितांवर पाळत ठेवली. त्यांना ताब्यात घेण्यासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प,चंद्रपूर वनवृत्त आणि गडचिरोली वनवृत्ताचे एक संयुक्त पथक तयार करण्यात आले. शनिवारी (22 जुलै) रोजी रात्री दोन वाजता गडचिरोलीजवळ आंबेशिवणी येथे स्थानिक पोलीसांच्या मदतीने संशयित ठिकाणी छापा टाकण्यात आला.
काही संशयितांना घेतलं ताब्यात
या कारवाई दरम्यान राहत्या झोपड्यांमधून वाघांच्या शिकारीकरीता वापरण्यात येणारे शिकंजे (6 नग) आणि इतर धारधार शस्त्रे जप्त करण्यात आले आहे. तर या शिकाऱ्यांकडून वाघांच्या नखे आणि काही रोख रक्कम जमा करण्यात आली आहे. तसेच या शिकाऱ्यांच्या कुटुंबियांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे करीमनगर, तेलंगणा आणि धुळे, महाराष्ट्र येथून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्व संशयित आरोपी हरियाणा आणि पंजाब राज्यातील असल्याचे माहितीच्या आधारे सिध्द झाले आहे. या प्रकरणी कसून चौकशी करण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.