Gadchiroli : मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शनिवारी (8 जुलै) रोजी गडचिरोलीतील पहिल्याच जाहीर कर्यक्रमात सरकारमध्ये सर्व अलबेल असल्याचं सांगितलं आहे. तसेच तिघांची एकत्रित शक्ती भविष्यात राजकीय विजयाची नांदी ठरणार असल्याचं देखील यावेळी त्यांनी म्हटलं आहे.
गडचिरोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात गडचिरोलीतील ग्रामीण जनतेने मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं. सत्तेमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच या तिघांनी एका जाहीर कार्यक्रमात एकत्रित हजेरी लावली.
या कार्यक्रमादरम्यान अजित पवार आणि एकनाथ शिंदे एकमेकांशी सहज संवाद साधत असल्याचं पाहायला मिळालं. तर अजित पवार यांनी ही त्यांच्या प्रशासनावरील नियंत्रणाची झलक दाखवल्याचं सांगण्यात येत आहे. या तिघांनी सरकारमध्ये सर्व काही ठीक असल्याचं देखील सांगण्यात येत होतं.
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता दोघांवर जोरदार टीका केली. जेव्हा कष्टकरी आणि क्षमता असलेल्या माणसावर अन्याय होतो, तेव्हा अजित पवारांसारखा प्रसंग घडतो असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं. तोंडात अंजीर आणि हातात खंजीर असलेल्यांचे काय करायचे हे अजित पवार यांना कळतं. घरी बसून काम करणाऱ्यांपेक्षा मोकळेपणाने बोलणारे चांगले.अजित पवार तुमच्या नावात जीत आहे. त्यामुळे चिंता नको आपला विजय निश्चित आहे. असल्याचे सूतोवाच ही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिघांच्या एकत्रित शक्तीला शंकराच्या त्रिशूळाची उपमा दिली आहे. तसेच शंकराच्या तिसऱ्या डोळ्याची उपमा देत तिघे त्रिशूळ म्हणून काम करणार असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच जे सामान्य जनतेचा छळ करतील विनाशासाठी आम्ही शंकराचा तिसरा डोळा ही होणार असल्याचे फडणवीसांनी म्हटलं.
तर याच कार्यक्रमात अजित पवारांनी त्यांची प्रशासनावरील पकड मजबूत आहे याची झलक दाखवली. गडचिरोली मधील अधिकाऱ्यांना गडचिरोलीत राहून जनतेचे काम करण्याची तंबी अजित पवारांनी यावेळी दिली आहे. जेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री गडचिरोलीत येतात, तेव्हा मंत्रालयातील सचिवांनी देखील इथे हजर राहायला हवं. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गडचिरोलीत पोस्टिंग असताना नागपुरात राहून नोकरी करू नये, त्यांनी मुख्यालयात राहिले पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा :