(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vidarbha rainfall : विदर्भातील शेतकरी सुखावला, जुलैच्या पावसाने भरुन काढली जूनची तूट
हवामान खात्याच्या अंदाजानुसार बुधवारी आणि गुरुवारी पूर्ण विदर्भात पावसाचा अंदाज आहे. आठ जुलै रोजी गोंदिया आणि गडचिरोली येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर शनिवारी नागपुरातही ऑरेंज अलर्टचा इशारा आहे.
नागपूरः यंदाच्या जून महिन्यात अपेक्षेप्रमाणे पावसाने हजेरी लावली नसल्याने विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र जुलैच्या सुरुवातीलाच नागपूरसह विदर्भात बरसलेल्या पावसाने काही अंशावर शेतकऱ्यांची चिंता दूर केली असल्याचे दिसून येत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भातील अकोल्यात आज (मंगळवारी) मुसळधार पावासाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र विदर्भातील भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूरसाठी पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही आहे. उर्वरित इतर जिल्ह्यांमध्ये मात्र पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज आहे.
शनिवारी नागपूरातही मुसळधार
हवामान खात्याच्या अंदाजानुसार बुधवारी आणि गुरुवारी (6 आणि 7 जुलै रोजी) पूर्ण विदर्भात पावसाचा अंदाज आहे. मात्र कुठेही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला नाही आहे. मात्र आठ जुलै रोजी शुक्रवारी गोंदिया आणि गडचिरोली येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर शनिवारी नागपूरातही ऑरेंज अलर्टचा इशारा आहे.
दुबार पेरणीचे संकट गेले
जूनमध्ये पावसाने अपक्षेपेक्षा कमी हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंचेते वातवण होते. तसेच जुलैच्या पहिल्या महिन्यातही पावसाने दांडी मारली असती तर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याच वेळ आली असती मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यातच वरुनदेवाच्या आगमनाने विदर्भातील शेतकरी सुखावला आहे.
अकोल्यात रात्रभर पावसाची संततधार
अकोल्यात सोमवारी रात्रभर पावसाची संततधार सुरु होती. मंगळवारी सकाळी 10 पर्यंत पाऊस सुरु होता. आता पुन्हा मंगळवारीही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाच्यावतीने देण्यात आला आहे.
यवतमाळमध्ये सर्वाधिक 101 मिमी पाऊस, तर बुलढाणा फक्त 7 मिमी
मागील चोवीस तासात विदर्भातील यवतमाळमध्ये सर्वाधिक म्हणजेच 101 मिमी पाऊस झाला. तर सर्वात कमी 7 मिमी पाऊस बुलढाण्यात झाला. अकोल्यात 44 मिमी, अमरावती मध्ये 48.4 मिमी, ब्रम्हपुरीमध्ये 45.4 मिमी, चंद्रपूरमध्ये 20.8 मिमी, नागपूरमध्ये 28 मिमी आणि वाशिममध्ये 18.8 मिमी पाऊस झाला. तर गडचिरोलीत 68 मिमी, गोंदियामध्ये 67 मिमी आणि वर्धेत 78.6 मिमी म्हणजेच मुसळधार पावसाची नोंद झाली.
मंगळवारीही राज्यात पाऊस
आज 5 जुलै रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील काही भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळ वारा व विजेच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस, तर 6 व 7 जुलैदरम्यान मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. तसेच उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नंदुरबार आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.