Dhule News : धुळ्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात (Temperature) प्रचंड वाढ झाली आहे. नागरिकांना उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. धुळे जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या पार गेल्याने सर्वांनाच वाढत्या तापमानामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाढलेल्या तापमानाचा फटका एका दुचाकी धारकला बसला आहे. 


धुळे तालुक्यातील सोनगीर फाटा (Songir Phata) येथील एका पेट्रोल पंपावर (Petrol Pump) एक दुचाकीत पेट्रोल भरताना अचानक आग (Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. समयसूचकता दाखवत पंपावरील कर्मचारी आणि पेट्रोल भरण्यासाठी दाखल झालेल्या ग्राहकांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.


दुचाकीधारकाला आगीची किरकोळ झळ


त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. यात दुचाकीधारकाला आगीची किरकोळ झळ लागली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने वाहनधारकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.


धुळ्यातील पाणीसाठी 25 टक्क्यांवर 


दरम्यान, धुळे जिल्ह्यातील वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील जल प्रकल्पातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पात पाण्याचा अवघा 25 टक्के साठा उरला असून काही प्रकल्प कोरडेठाक होत आहेत. या पार्श्वभूमीवर पाणी (Water) काटकसरीने वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


पाणी पातळीत आणखी घट होण्याची शक्यता


धुळे जिल्ह्यातील पाण्याची स्थिती यंदा बिकट झाली असून गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात 40.48 टक्के जलसाठा शिल्लक होता. मात्र यंदा वाढते तापमान आणि त्यात होणारे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पात पाण्याचा साठा अवघा 25 टक्क्यांपर्यंत (Dhule Water Storage) येऊन पोहोचला आहे. परिणामी पुढील काही दिवसात तापमान अधिक वाढल्याने पाण्याच्या पातळीत अजून घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


धुळ्यावर भीषण पाणी टंचाईचे संकट 


जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पात सध्या 124.61 दशलक्ष घनमीटर इतका साठा शिल्लक असून जिल्ह्यात 12 मध्यम आणि 47 लघु प्रकल्प आहेत. जल प्रकल्पांमधील घटणारा जलसाठा हा पुढील काही दिवसात भीषण पाणी टंचाईचे (Water Scarcity) संकट निर्माण करणारा आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


सावधान! देशातील 'या' भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा, खबरदारी घेण्याचं आवाहन, कुठं कसं असेल हवामान?


Nashik Heat Wave : नाशिककरांनो काळजी घ्या! शहरात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची आज नोंद