Nashik Heat : एप्रिल महिन्याच्या पंधरवाड्यातच थंडगार म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये (Nashik News) तापमानात (Temperature) कमालीची वाढ झाली आहे. आज नाशिकमध्ये 40.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या उकाड्यामुळे (Heat) नाशिककर हैराण झाल्याचे चित्र आहे. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद आज करण्यात आली आहे.  


नाशिकमध्ये सोमवारी 40.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. रविवारी 38.4, तर जळगावचे तापमान 39.0 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. येत्या आठवड्यात तापमान अधिक वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. 


दीर्घकाळ उन्हात राहू नये


या कालावधीमध्ये दीर्घकाळ उन्हात राहू नये, असे प्रादेशिक हवामान विभागाने सुचवले आहे. तसेच पाणी पिणे, सुती कपडे परिधान करणे, डोक्यावर टोपी, छत्री किंवा अन्य कपडा घेणेही अपेक्षित आहे. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा त्रास जाणवू शकतो, या पार्श्वभूमीवर नाशिक महानगर पालिकेकडून (Nashik NMC) आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वृद्ध नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे. 


नाशिकमध्ये तापमानाचा पारा आणखी वाढणार


दरम्यान, सोमवारपासून नाशिकमध्ये तापमानाचा पारा तापायला सुरुवात होणार आहे. सोमवारी 15 एप्रिल ते बुधवार 17 एप्रिल या कालावधीत कोकण विभागात कमाल तापमानाचा पारा तीन ते चार अंशांनी वाढू शकतो. तसेच या कालावधीत उष्णता निर्देशांक 40 ते 50 अंशांदरम्यान जाणवू शकेल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.  


सायंकाळी नाशिकमध्ये सोसाट्याचा वारा 


दरम्यान, आज सायंकाळच्या सुमारास नाशिकमध्ये अचानक ढग दाटून आले. सोसाट्याचा वारा वाहू लागला. पावसाच्या रिमझिम सरी कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. अचानक सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही काळ नाशिककरांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला होता. मात्र पाऊस (Rain) पडला नसल्याने काही काळाने पुन्हा नाशिकच्या तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे ढग दाटून आल्याने शेतकरी वर्गात मात्र चीन्तीचे वातावरण पसरले होते. 


यंदा देशात 106 टक्के पावसाची शक्यता


देशात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने हा पहिला अंदाज वर्तवला आहे. यंदा मान्सून (Monsoon 2024) सामान्यपेक्षा अधिक राहणार आहे. महाराष्ट्रात देखील यंदा मान्सून चांगला राहणार आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात (Maharashtra Monsoon Update) चांगला पाऊस होईल, असं भाकीत IMD ने वर्तवलं आहे.


आणखी वाचा 


हाय गर्मी! मुंबई, रायगड आणि ठाण्यात उष्णतेची लाट, आज आणि उद्या तापमान वाढीचा इशारा