Dhule News : धुळे शहरात (Dhule) मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी (Shasan Apalya Dari) हा कार्यक्रम उद्या संपन्न होणार असून दोन्ही प्रमुख नेत्यांच्या स्वागतासाठी शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून शहराच्या विविध भागात शिवसेना आणि भाजपचे झेंडे लावण्यात आले असून मात्र यातून राष्ट्रवादीचा झेंडा वगळण्यात आल्याने नागरिक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा रंगली आहे. 


शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा, तसेच या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने शासन आपल्या दारी हा उपक्रम घेतला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. विविध ठिकाणी शासन आपल्या दारीचा कार्यक्रम पार पडत असून उद्या धुळे शहरातील सुरत नागपूर महामार्गावर असलेल्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सहाच्या मैदानावर शासन आपल्या दारीचा उपक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे उपस्थित राहणार आहेत. 


दरम्यान, या कार्यक्रमासाठी येणाऱ्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागताची तसेच या कार्यक्रमाची तयारी मोठ्या प्रमाणावर सुरू असून ज्या मार्गावरून या प्रमुख नेत्यांचे आगमन होणार आहे. त्या मार्गावर पक्षाच्या झेंडे लावून हा मार्ग सजविण्यात आला आहे. मात्र विशेष म्हणजे, यात भाजप आणि शिवसेना या दोनच पक्षांचे झेंडे काल रात्री स्थानिक नेत्यांनी लावले असून यातून राष्ट्रवादीचा झेंडा वगळण्यात आला आहे. यामुळे एकीकडे राज्याच्या पातळीवर भाजप शिवसेना राष्ट्रवादीची युती झाली असली तरी स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ही युती मान्य आहे की नाही? असा प्रश्न हा राष्ट्रवादीचा झेंडा वगळण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. 


धुळ्यात शासन आपल्या दारी 


'शासन आपल्या दारी" अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रम सोमवार, 10 रोजी दुपारी अडीच वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एसआरपीएफ मैदान येथे होणार आहे. या ठिकाणी उपस्थित नागरिक व लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी शासनाच्या विविध 19 विभागांचे माहितीपूर्ण 34 स्टॉल लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे. कार्यक्रमासाठी लाभाथ्यांची ने-आण  करण्यासाठी एसटी महामंडळाच्या 271 बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात साक्री तालुक्यासाठी 64, शिरपूर 66, धुळे ग्रामीण 68, शिवखेडा 44 तसेच धुळे मनपा 29 अशी बसेसची सुविधा उपलब्ध असेल. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Shasan aaplya Dari Gadchiroli: शासन आपल्या दारी कार्यक्रम गडचिरोलीत; फडणवीस, शिंदे, पवारांची हजेरी