धुळे: धुळे (Dhule News) जिल्ह्यातील साक्री तालुक्यात निजामपूर जवळ असलेल्या वासखेडी ते चिपलीपाडा दरम्यानच्या शेतात असणाऱ्या मेणबत्तीच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात जैताने येथील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने दोषींवर कारवाई करून मृताच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती.  मात्र प्रत्यक्षात त्यांना काल फक्त एक लाख रुपयांचा धनादेश घाईघाईने देण्यात आला असल्याचा प्रकार समोर आला आहे. 


वासखेडी येथे 18 एप्रिल 2023 रोजी गावाच्या हद्दीत सुरू असलेला मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्यात स्फोट होऊन पाच महिला यात मृत्युमुखी पडल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः त्या ठिकाणी येवऊन पाहणी केली होती, त्यानंतर जोपर्यंत शासनाकडून दोषींवर कारवाई होत नाही व मृताच्या वारसांना आर्थिक मदत होत नाही तोपर्यंत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार नाहीत अशी भूमिका घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सदर ठिकाणी भेट देऊन संबंधित प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून मृताच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये जाहीर करण्यात आले होते. मात्र या मृतांच्या वारसांना फक्त एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. 


तीन महिन्यानंतर वारशांना अद्याप मदत नाही


दहा जुलै रोजी शासन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्ताने मुख्यमंत्री धुळे जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर घाई घाईत जिल्हा प्रशासनाने काल मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे फक्त चेक देण्यांत आले आहेत. त्यामुळे सदर प्रकरण तीन महिने उलटून मृतांच्या वारसांना शासनाकडून पूर्ण मदत मिळाली नसल्याने संतप्त झालेल्या वारसांनी याप्रकरणी जिल्हा प्रशासनाला जाब विचारला आहे. 10 तारखेच्या आत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही हा एक लाखांचा चेक मुख्यमंत्र्यांच्या जाहीर कार्यक्रमात फाडणार असल्याचा इशारा मृतांच्या वारसांनी दिला आहे.


शॉर्ट सर्किटमुळे लागली होती आग 


वाढदिवसानिमित्त वापरल्या जाणाऱ्या आकर्षक मेणबत्त्या या कारखान्यामध्ये बनवल्या जात होत्या. दुपारी दोन वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही भीषण आग लागली. या आगीत होरपळून पाच जणांचा मृत्यू झाला.  या मृत एका अल्पवयीन मुलीचाही समावेश होताा. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या निजामपूर गावाजवळ असलेल्या चिपलीपाडा शिवार येथे ही घटना घडली आहे. 


हे ही वाचा :


Dhule Acccidnt: आधी वडील गमावले; आता अपघातात भावाचा मृत्यू अन् आई सुद्धा गंभीर जखमी, चिमुकलीचे मन हेलावणारे हुंदके