Diwali 2022 : दिवाळीचा (Diwali 2022) सण येत्या 21 ऑक्टोबर पासून सुरु होतोय. त्यामुळे बाजारात विविध वस्तूंची रेलचेल पाहायला मिळतेय. बाजारात विविध सजावटीच्या वस्तू, दिवे, रांगोळी यांच्यासह रंगीबेरंगी आकाशकंदीलांनी देखील बाजारपेठा सजल्या आहेत.दिवाळीनिमित्त धुळ्याची बाजारपेठ सजली असून बाजारपेठेत विविध प्रकारचे आकाशकंदील विक्रीसाठी दाखल झाले आहेत. यंदा पर्यावरणपूरक आकाशकंदील यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असून 50 रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंतचे आकाशकंदील बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. 


दिव्यांचा आणि प्रकाशाचा उत्सव असणारा दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीनिमित्त बाजारपेठ सजण्यास सुरुवात झाली असून धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोड भागात आकाशकंदील विक्रेत्यांनी दुकानं थाटली आहेत. कोरोनाच्या तब्बल दोन वर्षांच्या कालखंडानंतर कोणत्याही निर्बंधांशिवाय यंदा दिवाळीचा सण साजरा करता येणार आहे. यामुळे बाजारपेठेत तसेच ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बाजारपेठेत विविध प्रकारचे आकाशकंदील, पणत्या बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या असून या वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय.


पर्यावरणपूरक आकाशकंदीलांना मागणी


बाजारपेठेत यंदा पर्यावरणपूरक आकाशकंदीलांना मोठ्या प्रमाणावर मागणी असून पन्नास रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत आकाशकंदीलाची विक्री होत आहे. गेल्या दोन वर्षानंतर यंदा पहिल्यांदाच बाजारपेठेत मोठी उलाढाल होत असल्याने व्यवसायिकांमध्ये देखील समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 


सजावटीच्या साहित्यांच्या किंमतीत वाढ


दिवाळीनिमित्त लागणाऱ्या विविध सजावटीचे साहित्यदेखील बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. मात्र, या साहित्यांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. तरीही वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची मागणी वाढतेय. 


चायना मेड वस्तूंकडे ग्राहकांनी फिरवली पाठ


दिवाळीनिमित्त बाजारात अनेक वस्तू पाहायला मिळतात. यामध्ये चायना मेड असलेल्या वस्तूंची संख्या मोठ्या प्रमाणात असते. मात्र, यावेळेस ग्राहकांनी भारतीय वस्तूंना प्राधान्य देण्यास पसंती केली आहे. त्यामुळे बाजारात मिळणाऱ्या आकाशकंदील, पणत्यांसह विविध सजावटीच्या वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होतेय. मात्र, नागरिकांनी चायना मेड वस्तूंकडे पाठ फिरवली असून याचा देखील परिणाम बाजारपेठेवर झाला आहे असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे.


महत्वाच्या बातम्या : 


Diwali 2022 : या दिवाळीत फराळही खा आणि हेल्दी राहा; जाणून घ्या आरोग्यदायी फराळाची पद्धत