Diwali 2022 : दिवाळीचा (Diwali 2022) सण 21 ऑक्टोबरपासून सगळीकडे साजरा केला जाणार आहे. दिवाळी म्हटलं की दिवे, आकाशकंदील, विविध रंगांच्या रांगोळी या सगळ्या गोष्टी तर डोळ्यांसमोर येतातच पण त्याआधीच खवय्येप्रेमी आतुरतेने वाट पाहतात ती खमंग फराळाची. दिवाळी लाडू, चकली, चिवडा, करंजी असे कितीतरी फराळांचे पदार्थाची चव आपल्या जीभेवर तरळू लागते. पण, या बदलत्या ऋतुचक्रानुसार दिवाळीमध्ये आपण जे पदार्थ खातोय ते आरोग्यासाठी हितकारक हेत का? हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. 


काळानुसार फराळातील पदार्थांमध्ये अनेक बदल होत गेले. मग ती चॉकलेटची मिठाई असो किंवा चॉकलेटपासून केली जाणारी करंजी असो. पण, सध्याच्या जीवनशैलीमध्ये आरोग्याच्या दृष्टीने आपण सध्या खात असणाऱ्या फराळामध्ये काही प्रमाणात बदल होणंही गरजेचं आहे. 


पूर्वीच्या फराळाचे स्वरूप :


पूर्वीच्या काळी म्हणजे आपल्या आजी किंवा पणजीच्या काळात गहू, तांदूळ, चणे, मूग यांसारख्या धान्यांचा आणि कडधान्यांचा वापर करून दिवाळी मधला संपूर्ण फराळ तयार केला जायचा. पण गेल्या काही वर्षांमध्ये फराळांचं स्वरूप पूर्णपणे बदललेलं आहे. आता धान्याची जागा मैद्याने घेतली आहे. आणि गुळाची जागा भरमसाठ साखरेने घेतली आहे.  


दिवाळीचा सण हिवाळा ऋतूत येतो. त्यामुळे या थंडीच्या दिवसांमध्ये शरीरातील ऊर्जा वाढविण्यासाठी पौष्टिक आहार शरीराला मिळावा यासाठीच या दिवाळीच्या फराळाची सुरुवात झाली असावी. मात्र, निसर्गाच्या बदलत्या ऋतु चक्रानुसार सध्या दिवाळीमध्ये थंडीचा मागमूसही नसतो. थंडीच्या दिवसांमध्ये कधी ऊन तर कधी पावसाचे चित्र दिसते. त्यामुळेच या अशा स्थितीत सध्या ज्या प्रकारचे फराळाचे पदार्थ आपण दिवाळीत खातोय त्याचे दुष्परिणाम दिवाळी झाल्यानंतर अगदी काही दिवसांतच दिसू लागतात.


तज्ज्ञांच्या मते, अपचन होणं, पित्त, पोटदुखी, मूळव्याध, खोकला, रक्तातील साखर वाढते, अचानक वजन वाढणे यांसारखे काही आरोग्यावर दुष्परिणाम होतात. मात्र, हे दुष्परिणाम अनेकदा जीभेच्या चवीला कळत नाहीत. त्यामुळे दिवाळीत लोक फराळांवर अगदी ताव मारतात. मात्र, यावर्षीची दिवाळी आरोग्यदायी जाण्यासाठी, फक्त तुमच्या घरी बनवल्या जाणाऱ्या फराळाच्या पदार्थांमध्ये थोडासा बदल करणं गरजेचं आहे. 


साखरेऐवजी गुळाचा वापर करा 



  • दिवाळीत गोड पदार्थ म्हणजेच शंकरपाळी, करंजी, लाडू यांसारख्या पदार्थांमध्ये साखरेऐवजी तुम्ही नैसर्गिक गुळाचा वापर करू शकता. 

  • मैदा न वापरता भाजलेल्या डाळी किंवा गव्हाचं, ज्वारीचं पीठ वापरू शकता.

  • घरच्या घरी तुम्ही मिठाई बनवत असाल तर त्यात माव्याचा वापर न करता सुका मेवा वापरून मिठाई बनवा.

  • चकली बनवताना गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ काही प्रमाणात मूग डाळ आणि अगदी थोडा मैदा वापरून चकली केलीत तर तुमच्या चकलीमध्ये खूप कमी प्रमाणात तेल उरेल.

  • जर तुम्ही गहू, तांदूळ यांसारख्या धान्यांपासून फराळाचे पदार्थ तयार करत असाल तर हे धान्यसुद्धा आरोग्यदायी आहेतच. पण या धान्यांना पर्याय म्हणून तुम्ही भगर, वरी, राळ यासारख्या तृणधान्यांचा वापर करून फराळाचे पदार्थ बनवा.


पौष्टिक फराळाचा आरोग्यासाठी फायदा :


तृणधाण्यांमुळे शरीरावर अतिरिक्त चरबी येत नाही. शरीरातील साखर वाढत नाही आणि तुमचं वजनही वाढणार नाही. कॉलेस्ट्रॉलची समस्या तुम्हाला जाणवणार नाही. त्यामुळे यंदाचा दिवाळीचा फराळ बनवताना तुम्ही जर अशा सकस घटकांचा वापर करून फराळाचे पदार्थ बनवले तर तुमची दिवाळी ही आरोग्यदायी जाईल. 


महत्वाच्या बातम्या : 


Diwali 2022 : दिवाळीत अभ्यंगस्नानाला आहे विशेष महत्त्व; जाणून घ्या उटणे लावण्याचे फायदे