Dhule News धुळे :  राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर (Shirpur) शहरासह तालुक्यात शुक्रवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला आहे. यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचा (Farmers) अडचणीत वाढ झाली आहे. 


धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात तसेच शहरात वादळी वाऱ्यासह शुक्रवारी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. याचा फटका रब्बी हंगामातील ज्वारी, मका, हरभरा या पिकांसह केळी आणि पपईला देखील बसला आहे.  शिरपूर तालुक्यात सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण होते. दुपारी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. 


केळी पिकाचे मोठे नुकसान


सध्या मक्याच्या पिकांची काढणी जोरात सुरू असून कापसाची विक्री ही सुरू आहे. तर शिरपूर तालुक्यातील अर्ध्या परिसरात केळी पीक मोठ्या प्रमाणावर बहरलेले असताना वादळामुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 


नुकसानभरपाई देण्याची मागणी 


जवळपास 80 टक्के केळी पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.  खरीप हंगामात देखील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असताना रब्बी हंगामातून शेतकऱ्यांना असलेली अपेक्षा देखील आता फोल ठरली असून शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. 


मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज


दरम्यान, देशाच्या विविध भागात पुढील 48 तासांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे. गारपिटीमुळे विदर्भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील 48 तासांत मराठवाडा आणि विदर्भात पावसासह गारपीट होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. 


पंजाब, राजस्थानमध्ये ऑरेंज अलर्ट 


रविवारी आणि सोमवारी उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने मध्य प्रदेश, हरियाणा, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थानमध्ये पुढील 24 तासात गारपीट होण्याचा अंदाज वर्तवला असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Ajay Baraskar on Manoj Jarange Patil : सरकारला कायद्याने राज्य चालवावं लागतं; सरकार मराठा समाजासमोर झुकलं, जरांगेंसमोर नाही : अजय बारसकर


Loksabha Election: मराठा नेते विनोद पाटील छ. संभाजीनगरमधून लोकसभा लढवणार; एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून उमेदवारी?