Dhule Rain : धुळे (Dhule) जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस (Unseasonal rain) आणि गारपिटीमुळं तब्बल 149 गावातील 10 हजार 108 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे साक्री आणि शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे झाले आहे. दरम्यान, नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाला जिल्हाधिकाऱ्यांकडून सादर करण्यात आला आहे.
33 टक्क्यांहून अधिक पिकांचं नुकसान
धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. साक्री तालुक्यातील 30 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले क्षेत्र तीन हजार 78 आहे. एकूण 18 गावातील 4 हजार 729 शेतकऱ्यांना या अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा फटका बसला आहे. तर शिरपूर तालुक्यातील 3 हजार 175 हेक्टरवर 33 टक्क्यांपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये 58 गावातील 2 हजार 550 शेतकऱ्यांचा समावेश आहे. शिंदखेडा तालुक्यात तब्बल 1 हजार 909 हेक्टर क्षेत्रावर 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असून, 72 गावातील 2 हजार 827 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
पालकमंत्री गिरीश महाजन यांचे पंचनामे करण्याचे आदेश
दरम्यान, नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केल्यानंतर पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र जिल्ह्यातील बहुतांश भागात अद्यापही पंचनामे पूर्ण झाले नाहीत. अशातच आता जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
राज्यात 13 हजार 729 हेक्टरील पिकांचे नुकसान
अवकाळी पावसामुळं (Unseasonal Rain) राज्यातील 13 हजार 729 हेक्टरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. राज्यात आठ जिल्ह्यात या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शेतकरी नुकसानीच्या मुद्यावरुन विरोधक आक्रमक झाले होते. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना फडणवीसांनी विधीमंडळात ही माहिती दिली. अवकाळी पावसामुळं गहू, ज्वारी, हरभरा, मका, द्राक्ष, आंबा, पपई, संत्रा या पिकांचं नुकसान झाले असून, तत्काळ नकसानग्रस्त भागाची माहिती शासनानं मागितली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले.
अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पीक वाया गेली आहेत. त्यामुळं विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी सभागृहात केली. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागितले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे फडणवीस म्हणाले.