Maharashtra Rain : हवामान विभागानं (Meteorology Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. याचा मोठा फटका ग्रामीण भागाला बसला आहे. या पावसामुळं काढणीला आलेला कांदा, गहू आणि हरभरा पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच पिकांवर रोग पडण्याची शक्यता देखील आहे. तसेच फळबागांना देखील फटका बसण्याची शक्यता आहे. पाहुयात कुठे कुठे अवकाळी पावसानं हजेरी लावली...


Dhule Rain : धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान 


धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा, शिरपूर या तालुक्यांसह धुळे तालुक्यात मध्यरात्रीनंतर अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. यामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. या अवकाळी पावसामध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. गहू, हरभरा, पपई यांसारख्या पिकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.


कापणीला आलेला गहू जमीनदोस्त


हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार धुळे जिल्ह्यात मध्यरात्रीनंतर अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. त्याचबरोबर विजांचा कडकडाटासह वादळी वारा यासह झालेल्या या अवकाळी पावसामुळे कापणीला आलेला गहू अक्षरशः जमीनदोस्त झाला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. मायबाप सरकारनं या नुकसानीची गांभीर्यानं दखल घ्यावी आणि पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


Buldhana Rain : बुलढाणा जिल्ह्यातही पावसाची हजेरी 


बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद परिसरात पावसाच्या सरी बरसल्या आहेत. या पावसामुळं शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


Nashik Rain : नाशिक जिल्ह्यातही अवकाळी पावसाचा फटका


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. कारण ग्रामीण भागाला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. सटाणा, कळवण तालुक्यासह  ग्रामीण भागात  काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. सकाळपासूनच अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. काढणीला आलेला कांदा, गहू आणि हरभरा पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच पिकावर रोग पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा औषध फवारणीचा खर्च वाढणार आहे. एकीकडं कांद्यासह भाजीपाल्याला भाव नाही, दुसरीकडे पुन्हा अस्मानी संकट आल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


Marathwada Weather: आजपासून मराठवाड्यातील 'या' जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता