धुळे : धुळे (Dhule) जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथील प्रेमीयुगुलाने (Couple Suicide) झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तालुक्यातील जांभोरे गावातील जंगलात हे दोघे झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. 'आई दादा मला माफ करा, लवकर जात आहे, काळजी घ्या', अशा आशयाची चिठ्ठी आढळून आल्याची प्राथमिक माहिती आहे. तर दुसरीकडे यांचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 


अलीकडे प्रेमप्रकरणातून (Love Affair) टोकाचे पाऊल उचलण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. घरच्यांचा लग्नाला असणारा विरोध हे प्रमुख कारण यामागे सांगितले जात आहे. अशातच साक्री (sakri) तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथील रंजना चौरे ही विद्यार्थिनी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बेपत्ता झाली होती. याबाबत माहिती घेण्यासाठी वस्तीगृहातून संबंधित विद्यार्थिनीच्या वडिलांना फोन करण्यात आला होता, मात्र ती घरी आली नसल्याचे वडिलांनी सांगितल्यानंतर तिचा शोध सुरू करण्यात आला. हा शोध सुरू असताना काल दुपारच्या सुमारास जांभोरे गाव परिसरात तरुण तरुणीचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. हे दोघेही एकाच गावातील म्हणजे पिंपळगाव येथील असून झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले. तपासाअंती वस्तीगृहातून बेपत्ता झालेली मुलगी या ठिकाणी आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. 


साक्री तालुक्यातील निजामपूरपासून जवळ असलेल्या जांभोरे येथील जंगलात एकाच दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुण व तरुणी आढळले. रंजना रेडू चौरे आणि विलास भाल्या गांगुर्डे अशी मृतांची नावे आहेत. मागील 3 वर्षापासून दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्याचे बोलले जात आहे. मृत रंजना साक्री येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात राहत होती. ती बारावीला होती. मात्र दोन तीन दिवसांपासून ती बेपत्ता झाली होती. तसेच सदर मुलगा विलासही गावात नव्हता. दरम्यान काल दुपारच्या सुमारास पिंपळगावजवळील जांभोरे शिवारात या दोघांचा एका झाडाला गळफास (Suicide) घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तातडीने पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर दोघांचेही मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. 


नातेवाईकांकडून घातपात झाल्याचा संशय 


दरम्यान विलासजवळ दोन पानांची चिठ्ठी आढळून आली असून या चिठ्ठीत त्याने 'आई-दादा मला माफ करा, लवकर जात आहे. तुमची काळजी घ्या, असे लिहिले असल्याचे समजते आहे. मात्र एकीकडे या दोघांचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. साक्री येथे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह गावी नेण्यात आले. त्यानंतर दुपारी 1 वाजता दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. घटनेबद्दल मृत रंजनाचे वडील रेडू गणपत चौरे यांनी दिलेल्या माहितीवरून निजामपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


Pune News : लेखक राजन खान यांच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल, चिठ्ठीतून आले कारण समोर!