धुळे : काँग्रेसचे आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील (Kunal Patil) यांच्या जवाहर सूतगिरणीवर (Jawahar Yarn Mill) छापेमारी करण्यात आली असून गेल्या 24 तासांपासून ही चौकशी सुरु असल्याची माहिती आहे. संबंधित तपास यंत्रणांकडून कमालीची गुप्तता बाळगण्यात आली असून या प्रकरणी अद्याप कुणाल पाटील यांची कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने नेमके या छापेमारीचे कारण समजू शकले नाही. मात्र, या कारवाईमुळे धुळे (Dhule) शहरातील राजकीय वातावरणात चर्चाना उधाण आले आहे.  


धुळे शहराजवळील जवाहर सहकारी सूतगिरणीत गेल्या 24 तासांपासून सुरू असलेली चौकशी अजूनही सुरू असून या चौकशीबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. ही कारवाई आयकर विभागाकडून (Income Tax Department) सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जवाहर सहकारी सूतगिरणीच्या चौकशीसाठी मुंबई, पुणे (Pune), नागपूर, नाशिक येथून पथक आल्याची माहिती मिळाली असून या जवाहर सहकारी सूतगिरणीचा ठेका गुजरातच्या एका कंपनीला देण्यात आला असून त्या कंपनीच्या चौकशीसाठी हे पथक आल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. काँग्रेसचे (Congress) आमदार कुणाल पाटील यांचा वर्चस्व असलेल्या या जवाहर सुतगिरणीतील चौकशीच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना ऊत आला आहे.


दरम्यान. धुळे शहराजवळ असलेल्या मोराणे येथे जवाहर सूतगिरणी आहे. याच ठिकाणी आज पहाटेच्या सुमारास तपास यंत्रणांनी छापा टाकला आहे. एक पथक पुणे आणि नाशिक येथील असल्याचे समजते आहे, आयकर विभागाकडून ही कारवाई केली जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याचप्रमाने सूतगिरणी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आला आहे. विशेष म्हणजे नाशिक पोलिसांची (Nashik Police) देखील मदत घेतल्याचे दिसून येत आहे. कुठल्याही व्यक्तीला आतमध्ये जाऊ देण्यात मज्जाव करण्यात आला असून येथील कर्मचाऱ्यांचे मोबाईल हे जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर येथील लँडलाईन सुविधा देखील बंद करण्यात आली आहे. त्यामुळे संध्याकाळपर्यंत नेमके चित्र स्पष्ट होणार असल्याचे समजते. याबाबत कुणाल पाटील यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकलेला नाही, त्यामुळे आज सायंकाळपर्यंत चौकशी झाल्यानंतर कुणाल पाटील आपली भूमिका मांडणार असल्याचे समोर येत आहे. 


कुणाल पाटील यांची बोलण्यास टाळाटाळ 


कुणाल पाटील हे काँग्रेसचे धुळे शहरातील एकमेव आमदार असून त्यांच्याकडे जवाहर सूतगिरणीचे अध्यक्षपद आहे. शिवाय काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच आमदार कुणाल पाटील यांच्याकडे विदर्भातील अमरावती, नागपूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांनतर लागलीच या सुतगिरणीवर छापेमारी करण्यात आल्याने राजकीय सुडापोटी कारवाई केली जात असल्याच्या चर्चा शहरभर रंगू लागल्या आहेत. त्याचबरोबर आगामी लोकसभांच्या दृष्टीने देखील कुणाल पाटील यांच्यावर कुरघोडी करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.



इतर महत्वाची बातमी : 


Kunal Patil On Congress : काँग्रेसची सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी : कुणाल पाटील