Missing Minors Children: महाराष्ट्रात सध्या महिलांचे गायब (Missing) होण्याचं प्रमाण वाढलं असताना, आता 14 वर्षाखालीं मुलामुलींचे घर सोडून जाण्याचं प्रमाण वाढले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकट्या औरंगाबाद (Aurangabad) शहरात गेल्या सहा महिन्यात 134 मुलांनी घर सोडले. विशेष म्हणजे या अल्पवयीन मुलामुलींचं घर सोडण्याच्या कारणांपैकी एक मुख्य कारण प्रेमप्रकरण असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता पालकांची चिंता वाढली आहे. 


काबाडकष्ट करून वाढवणाऱ्या आई-वडिलांपेक्षा सध्या मुला मुलींना आभासी जगातील मित्र, मैत्रीणी, प्रियकर अधिक महत्त्वाचे वाटू लागले. कमी वयातील असमज, आकर्षक, वेब सिरीज, मोबाईल, सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे मुलांमधील सहनशीलता संपत चालली आहे, असे निरीक्षण तज्ञांनी नोंदवले आहे. अशा प्रकारच्या दोन घटना मागील आठवड्यात घडल्याचे समोर आलय. पहिल्या घटनेत औरंगाबाद शहरातील एका मुलीची सोशल मीडियावर भुवनेश्वर येथील मुलासोबत ओळख झाली, महिन्याभराच्या ओळखीवर तिने थेट भुवनेश्वर गाठल्याचा प्रकार समोर आला आहे. दुसऱ्या घटनेत पंधरा वर्षीय मुलीने एकतर्फी प्रेमातून अहमदाबादहून थेट औरंगाबाद गाठले आणि पोलिसांना प्रियकर शोधून देण्याची मागणी केली. 


आकडेवारी काय सांगते? 



  • मागील साडेतीन वर्षांमध्ये औरंगाबादमधील तब्बल 501 मुलामुलींनी घर सोडले.

  • धक्कादायक बाब म्हणजे घर सोडणाऱ्या मुलांमध्ये 80 टक्के मुली आहेत.

  • समोर आलेल्या आकडेवारीनुसार 2020 साली 97 मुलामुलींनी घर सोडले होते.

  • पुढील वर्षात म्हणजेच 2021 वर्षात हा आकडा वाढून 112 वर पोहचला होता.

  • तर मागील वर्षे म्हणजेच 2022 वर्षात 158  अल्पवयीन मुलांनी आपले घर सोडले.

  • विशेष म्हणजे 2023 च्या जुन महिन्यापर्यंतच तब्बल 134 मुलामुलींनी घर सोडल्याचे समोर आले आहे. 


मुलं घर का सोडतायत? 


आजकाल बहुतांश आईवडील नोकरीत व्यस्त असतात. कुटुंबात संवाद साधण्यासाठी कोणीही नसल्याने अल्पवयीन मुलं सोशल मीडियाच्या माध्यमातून निरनिराळ्या आमिषांना बळी पडतात. मित्रांकडून अथवा प्रियकराकडून ती पोकळी भरली जात असल्याचा त्यांना भास होतो. पुढे चालून मैत्रीचं नातं कुटुंबातील नात्यापेक्षा अधिक महत्वाचे वाटू लागते आणि यातूनच घर सोडण्याच्या निर्णयापर्यंत मुलं येऊन थांबतात. 


अल्पवयीन मुला-मुलींमध्ये शारीरिक आकर्षण वाढत आहे


अल्पवयीन मुला-मुलींच्या हातात स्मार्टफोन आले आहेत, त्या स्मार्टफोनचा वाढता उपयोग अत्यंत धोकादायक ठरत आहे. मोबाईलसह टीव्ही आणि चित्रपटांमुळे समाजमाध्यमांमुळे अल्पवयीन मुला-मुलींमध्ये शारीरिक आकर्षण वाढत आहे. त्यालाच ते प्रेम समजू लागतात. त्यातून ते पळून जाण्यासाठी प्रेरित होतात अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांचा मित्र झाल पाहिजे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


"साहेब... महिला अत्याचारावर अधिवेशनात चर्चा करा"; तरुणानं मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेत्याला लिहलं स्वतःच्या रक्तानं पत्र