धुळे (Dhule) : "अजितदादा नाराज नाहीत, आम्ही सगळे एक आहोत. एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) त्यांचं बघावं आणि लोकसभेची निवडणूक लढवून दाखवावी," असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी म्हटलं आहे. अर्थ खात्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यावर गिरीश महाजन यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. अर्थ खाते हातात असल्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. परंतु हे पुढे टिकेल की नाही हे माहित नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.
मंत्री गिरीश महाजन हे रविवारी (24 सप्टेंबर) धुळ्यात गणपतीची आरास बघण्यासाठी आले होते. त्यावेळेस त्यांनी पुन्हा एकनाथ खडसे यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, "अजितदादा नाराज वगैरे काही नाहीत. आम्ही सगळे एक आहोत. एकनाथ खडसेंनी त्यांचं बघावं, तुमचं पुढचं भविष्य काय आहे ते बघावं तसेच एकनाथ खडसे यांनी लोकसभेला उभे राहून दाखवावे, कशाला उगाच हा नाराज, तो नाराज करत आहात. दिल्या घरी त्यांनी सुखी राहावे." तसंच जळगावात असताना गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर जोरदार हल्लाबोल केला होता. ते म्हणाले होते की, "एकनाथ खडसेंनी शरद पवारांना घट्ट धरुन रहावे. भाजपमध्ये येण्यासाठी खडसेंनी जास्त हातपाय जोडू नये. राष्ट्रवादीमध्ये राहिलेले देखील आमच्याकडे यायला लागले आहेत. मला माहित आहे खडसे अजित पवारांसोबत येण्यासाठी काय काय करत आहेत. याची कल्पना सर्वांना आहे. अगदी अजित पवारांनासुद्धा आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे सर्व प्रयत्न थांबवावेत."
एकनाथ खडसे काय म्हणाले होते?
अजित पवार यांनी शनिवारी (23 सप्टेंबर) बारामतीत अर्थमंत्रीपदावरून मोठे वक्तव्य केले होते. "आज माझ्याकडे अर्थ खाते आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण, यापुढे अर्थ खाते टिकेल की नाही टिकेल, हे सांगता येत नाही," असं अजित पवार यांनी म्हणाले होते. या वक्तव्यानंतर अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरु झाली. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे म्हणाले होते की, "अजित पवार महायुतीत राहिले की नाही राहिले, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवारांना डावललं जात आहे, अशी भावना त्यांच्या मनात दिसतेय. त्यामुळे त्यांनी नाराजीची भावना व्यक्त केली असावी." यानंतर गिरीश महाजन यांनी अजित पवार नाराज नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
आता मुख्यमंत्री व मंत्र्यांचा प्रोटोकॉल अंबादास दानवे ठरवणार का?
शिवसेनेच्या आमदारांवर अपात्रतेच्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणी सुरु असताना ठाकरे गटाचे नेते व विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केला होता. राहुल नार्वेकर हे भाजप नेते आहेत. विधानसभा अध्यक्षपद हे निष्पक्षपणे काम करण्याची जागा असली तरी ते सध्या राजकीय हेतूने काम करत आहेत. नार्वेकर हे सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत, अशा शब्दात दानवे यांनी टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, "आता अंबादास दानवे यांनी आम्हाला प्रोटोकॉल सांगावा की त्यांनी कसं राहावं, कसं खावं, कसे कपडे घालावे, कसं बसावं, कुणाशी कसं बोलावं, कोणत्या गाडीत बसावं. अंबादास दानवे अत्यंत क्वालिफाईड व हुशार व्यक्ती आहेत. ते एक चांगले वकील देखील आहेत. आताच त्यांनी सभागृहाचं कामकाज चांगल्या पद्धतीने सांभाळले आहे. आता तुमच्या निकालाची वेळ आली तर तुम्हाला त्यांचे वाकडे दिसत आहे का? मला अंबादास दानवे यांचं आश्चर्य वाटत आहे आता मुख्यमंत्री व मंत्र्यांचा प्रोटोकॉल ते ठरवतील का?"
हेही वाचा