मुंबई : 'वृषभराजा'चा पोळा सण 'बळीराजा'साठी सर्वांत महत्त्वाचा सण समजला जातो. अतिशय जिव्हाळ्याचा, पारंपरिक अन् लोकसंस्कृतीचा वारसा असलेला हा सण यंदा महागाई सोबतच लम्पीच्या प्रार्दुभाव आणि दुष्काळाच्या सावटाखाली दबला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा महागाई वाढल्याने बैलांच्या (Bail Pola 2023) सजावटीसाठी लागणाऱ्या आवश्यक साहित्यांचे दर विस ते तीस टक्क्यांनी वाढले आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी भरलेल्या आठवडे बाजारात पोळ्यासाठी विविध साहित्याची दुकाने सजली असली तरी मागील वर्षाच्या तुलनेत दुकानदारासह खरेदीदारांची गर्दी जेमतेम असल्याचे चित्र पाहवयास मिळाले.


दरवर्षी पोळा सणाला बैलांसाठी नवीन साहित्य खरेदी करून त्यांची सजावट करणाऱ्या शेतकऱ्यांनी महागाईमुळे बाजाराकडे पाठ फिरवून जुनेच साहित्य वापरण्याचा निर्णय घेतल्याने यंदा बाजारात थंड प्रतिसाद मिळत आहे. यंदा जिल्ह्यात  28 जूनपासून गायब झालेल्या पावसामुळे खरिप पिकांची स्थिती नाजूक बनली होती; पण दोन दिवसांपासून रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काहीसे हास्य फुलले आहे. 


साजश्रृंगाराच्या सहित्याला परिणामी शेतकऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद


मागील काही वर्षांपासून ट्रॅक्टरचा प्रत्येक कामांसाठी उपयोग वाढल्याने बैलांची संख्या झपाट्याने कमी होऊन सणाची व्यापकताही कमी झाली. त्यामुळे साजश्रृंगाराच्या सहित्याला परिणामी शेतकऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. यंदा पावसाने दडी मारल्याने पिकांची स्थिती नाजूक असून खरीप हंगामात केलेला खर्च पदरात पडणे कठीण आहे.अनेक शेतकरी उधारी-उसनवारी करून पोळा सणासाठी बैलजोडीच्या साजाची खरेदी करत आहेत. बैलांचे शेती व्यवसायात विशेष महत्त्व असल्याने ते शेतकऱ्यांचा सोबती म्हणून ओळखला जातो. शेतकऱ्यांसाठी त्यांचे बैल वर्षभर शेतात राबतात. त्यामुळे बैलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी पोळ्याच्या दिवशी बैलांची रंगरंगोटी व सजावट करून पूजा केली जाते. पोळ्याच्या पहिल्या दिवशी बैलांचे खांदे तूप व हळदीने मळणी केले जाते. सलग दोन ते तीन दिवस बैलांना आंघोळ घालून त्यांना पुरणपोळी व नैवेद्य भरवला जातो. परंतु यंदा पिण्याच्या पाण्याचीच पंचाईत असून सर्वत्र जलसाठे कोरडे राहून बैलांना आंघोळ घालण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.


 वरूळच्या आठवडे बाजारात वेसण 40 ते 50 रुपये जोड, कासरा 80 ते 200 रुपये, मोरखी 50 ते 125 रुपये, कवडी गेठा 100 रुपये, गोंडा 50 ते 150 रुपये, घागरमाळ जोडी एक हजार ते दीड हजार रुपये, भोरकडी 50 ते 100 रुपये जोडी, झुली दोन ते अडीच हजार रुपये, मोरक्या जोड 60 ते 110 रुपये तर हिंगुळ 50 ग्रॅमचा डबा पन्नास रुपये तर 100  ग्रॅमचा 80 रुपये प्रमाणे किमती असल्याचे पाहवयास मिळाले.


हे ही वाचा:


 बैलपोळ्याचा सण दोन दिवसांवर, सजावटीच्या रंगीबेरंगी साहित्यांनी फुलला बाजार