Bail Pola : शेतकऱ्यांच्या (Farmers) दृष्टीनं महत्त्वाचा असलेला सण म्हणजे बैलपोळा (Bail Pola). हा बैलपोळ्याचा सण दोन दिवसांवर आला आहे. गुरुवारी म्हणजे 14 सप्टेंबरला बैलपोळा साजरा होणार आहे. या बैलपोळ्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर बैलांच्या सजावटीच्या साहित्यांनी बाजार फुलले आहेत. हिंगोलीच्या बाजारपेठेत देखील विविध प्रकारचे रंगीबेरंगी सजावटीचे साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे. वर्षभर आपल्याला साथ देणाऱ्या बैलांच्या सजावटीसाठी शेतकरीसुद्धा मोठ्या प्रमाणात साज शृंगाराच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहे.


बैलपोळा सणासाठी रंगीबेरंगी कवड्यांच्या माळा, घागर माळा, त्याचबरोबर झुले, विविध प्रकारचे कंडे, गोंडे, चंगाळी, बैलाच्या शिंगाना देण्यासाठी विविध प्रकारचे कलरतसेच इतर सजावटीचे साहित्य मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले आहे. या खरेदीसाठी शेतकऱ्यांची बाजारात गर्दी होताना दिसत आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला पोळ्याच्या दिवशी विविध प्रकारे सजविले जाते. गळ्यात चंगाळे (घंटा) बांधल्या जातात. सुती धाग्यात विणलेल्या चंगाळ्यांवर लोकरी गोंडे गुंफलेले असतात.


बैलपोळ्या दिवशी काय केलं जातं?


बैल पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरुचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य बैलांना दाखवला जातो. प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे शेतकरी बैलांचा साजशृंगार करतात. बैल सजवतात, त्यांची मिरवणुकीत काढली जाते. या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. अनेक गावांमध्ये पोळ्याला शर्यतींचे आयोजन करण्यात येते.


महाराष्ट्रासह तेलंगणा आणि मध्य प्रदेशातही बैलपोळा साजरा केला जातो


आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी बैल पोळ्याचे महत्व अजूनही कायम आहे. शेतकर्‍यासोबत वर्षभर शेतात राबणार्‍या बैलांचा एकमेव सण पोळा श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हा बैल पोळ्याचा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रासह , विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागात सुद्धा हा सण साजरा होतो.


महत्त्वाच्या बातम्या:


Bail Pola : बैल पोळा नेमका का साजरा केला जातो? शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पोळ्याचं महत्व