धुळे : आपल्या आयुष्यात शिक्षकाचं आणि शिक्षणाचं महत्व अनन्यसाधारण आहे. आयुष्यातील प्रत्येक माणूस आपल्यासाठी काही ना काही करत असतो. शिकवत असतो, मार्गदर्शन करत असतो. तो आपल्या आयुष्यातील शिक्षकांचं काम करतो. मात्र अनेक मुलं अशीही आहेत, ज्यांना आपल्या परिस्थितीमुळे शिकता येत नाही. मात्र विद्यार्थ्यांना जेव्हा एखादा शिक्षक स्वच्छेने येणाऱ्या अडचणींवर मात करीत ज्ञानदानाच पवित्र काम करतो. त्यावेळी तो शिक्षक संपूर्ण समाजासाठी आदर्शवत ठरत असतो. धुळे (Dhule) शहरातील अविनाश पाटील हे अशाच पद्धतीने ज्ञानदानाचे पवित्र काम करीत असून, त्यांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे


आज सर्वत्र शिक्षक दिन (Teachers Day) म्हणून साजरा केला जात आहे. मात्र आजही अनेक खेडोपाडी शिक्षणाची गंगा पोहोचलेली नाही. मात्र काही आदर्श शिक्षक आपल्या आयुष्यातील बहुमूल्य वेळ अशा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी धडपडत असतात. धुळे शहरातील आदर्श माध्यमिक शाळेत (Adarsh Madhyamik School) उपशिक्षक पदावर काम करणारे अविनाश पाटील (Avinash Patil) हे शाळाबाह्य मुलांची माहिती घेत असताना नकाने गावाजवळील एका पाड्यावर राहणारा एक विद्यार्थी परिस्थिती अभावी शाळेत येऊ शकत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. या विद्यार्थ्याला शिकवून मोठे करण्याचे स्वप्न अविनाश पाटील यांनी पाहिले, मात्र या पाड्यावर अत्यंत गरीब परिस्थितीत जीवन जगणारे विद्यार्थी शालेय शिक्षण घेऊ शकत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. या विद्यार्थ्यांसाठी या पाड्यावरच शाळा सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 


दरम्यान आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या नागरिकांशी संवाद साधून याच भागात निसर्गाच्या सानिध्यात ही शाळा (School) सुरू करून त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य हाती घेतले. या पाड्यावरील जवळपास 20 पेक्षा अधिक मुले सध्या अविनाश पाटील यांच्याकडून प्राथमिक वर्गाचे धडे गिरवित आहेत. सुरुवातीला या विद्यार्थ्यांना पाटी पेन्सिल तसेच वही आणि पेन यांचा प्रश्न उभा राहिला. मात्र हा प्रश्न आपल्या कामाच्या आड येऊ न देता कृतिशील शिक्षणावर भर देत मातीवरच झाडाच्या काडीच्या सहाय्याने अक्षरे गिरवण्यास या विद्यार्थ्यांकडून अविनाश पाटील यांनी सुरुवात केली. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची वाढती गोडी हीच त्यांची प्रेरणा बनली असून या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा देखील अविनाश पाटील यांना पाठिंबा मिळत आहे. सकाळी आठ वाजता भरणारी ही शाळा 10 वाजेपर्यंत सुरू असते. 


समाजात शिक्षकांचे योगदान महत्वपूर्ण 


शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कुणाला डॉक्टर तर कुणाला इंजिनियर तर कोणाला पोलीस व्हायचे असून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे अविनाश पाटील यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्रात एकीकडे मोठ्या प्रमाणावर अनागोंदी कारभार सुरू असल्याचे समोर येत असताना दुसरीकडे पाड्यावरील विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणारे अविनाश पाटील हे फक्त शिक्षण क्षेत्रासाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी आदर्शवत ठरले आहेत. आजही अनेक भागातील लहान मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी योगदान देणे महत्वाचे आहे. अनेक मुलं कुणी वीटभट्टीवर, कुणी हॉटेलात तर कुणी सिग्नलवर भीक मागताना आपण नेहमीच पाहतो, मात्र या मुलांना देखील शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


Teachers Day : हसत खेळत शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड, विद्यार्थ्यांमध्ये रमत पुण्याच्या मृणाल गांजाळे यांनी मिळवला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार; कशी चालते शाळा?