धाराशिव : देशाच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने राज्य सरकारकडून (Government) 75 हजारांची मेगाभरती प्रक्रिया सुरु आहे. यामध्ये तलाठी (महसूल), जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागकडून भरती प्रक्रिया पार पडतेय.  यासाठी लाखोंच्या संख्यने उमेदवारांनी अर्ज (Job Application) केले आहेत. प्रत्येक भरतीसाठी रिक्त जागांच्या तुलनेत उमेदवारांच्या अर्जांची संख्या किमान तिप्पट ते पाचपट पाहायला मिळत आहे. त्यामुळे अगदी काही हजार जागांसाठी लाखोंच्या संख्यने अर्ज आल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रत्येक अर्जासाठी राज्य शुल्क भरावे लागते. प्रत्येक भरतीसाठी खुल्या प्रवर्गाला एक हजार रुपयांचे शुल्क भरावे लागते. तर मागासवर्गीय उमेदवारांना अर्जासाठी 900 रुपयांचे शुल्क भरावे लागत आहे. त्यामुळे या तीन विभागांच्या भरतीमधून सरकारच्या तिजोरीमध्ये अंदाजे 266 कोटी रुपयांचे शुल्क जमा झाल्याचं सांगण्यात येतय. 

साडेचार महिन्यांपूर्वी गृह विभागातर्फे पोलिस भरती पार पडली. त्यावेळी देखील 18 हजार 831 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. त्यासाठी   जवळपास 18 लाख उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यामधून कोट्यावधी रुपयांचे शुल्क जमा राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये जमा झाले. 

काही हजार जागांसाठी लाखोंच्या संख्येने अर्ज

दरम्यान सध्या राज्य सरकारकडून तीन विभागांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलीये. यामध्ये तलाठी भरतीची परीक्षा घेण्यात आली होती. काही दिवासांनंतर जिल्हा परिषदेच्या पदांसाठी भरती प्रक्रिया पार परडणार आहे. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात येईल.  या प्रत्येक प्रक्रियेसाठी अनेक उमेदवार अर्ज करत आहेत. त्यामुळे लाखोंच्या संख्येने काही हजार जागांसाठी अर्ज होत असल्याचं चित्र पाहायला मिळतयं. तर राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या कंत्राटी भरती प्रक्रियेविरोधात तरुणांकडून तीव्र विरोध करण्यात येतोय.

विभाग रिक्त जागा एकूण अर्ज अर्ज शुल्क
तलाठी   4, 657 10.41 लाख 100 कोटी 
जिल्हा परिषद 19, 460 14.51 लाख 145 कोटी 
आरोग्य 10,949 02.13 लाख 22. 54 कोटी
एकूण  35,066 27,05,713 265.54 कोटी 

कंत्राटी भरती प्रक्रियेला विरोध 

सरकारी भरतीला पर्याय म्हणून सरकारने कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे यासाठी 9 कंपन्यांना ठेका देखील देण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान सरकारच्या निर्णयामुळे तरुणांमध्येही बराच आक्रोश असल्याचं पाहायला मिळतोय. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचा तीव्र विरोध करण्यात येत असल्याचं चित्र सध्या आहे. तसेच, अ, ब, क आणि ड संवर्गातील या जागा असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात केवळ कंत्राटी पद्धतीने भरती होणार असेल तर ही बाब संशयास्पद असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. 

हेही वाचा : 

Dhangar Reservation : राज्य सरकारने आणखी वेळ मागितला, बैठकीत तोडगा नाहीच, आंदोलक उपोषणावर ठाम; धनगर बांधवांचा अंत पाहू नये, आंदोलकांचा इशारा