धाराशिव: नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या एका मेडिकल चालकावर अन्न औषध प्रशासन विभागाने (Food Drug Administration Department) केलेल्या कारवाईनंतर धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. उमरगा येथील मेडिकल दुकानामधून झोपेची औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याविना विकली जात असल्याची माहिती अन्न औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यानंतर या मेडिकल दुकानात पोलीस व अन्न औषध प्रशासन विभागाच्या संयुक्त पथकाने धाड टाकून 1 लाख 40 हजार रुपयाचा अवैध औषधसाठा जप्त केला आहे. विशेष म्हणजे या मेडिकल चालकाने आतापर्यंत 19 हजारांवर नशेच्या गोळ्यांची विक्री केल्याचे तपासात समोर आले आहे. तर, या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात मेडिकल दुकानदाराविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गणेश गोविंद माने असे आरोपीचे नाव आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवच्या उमरगा येथे गणेश गोविंद माने यांचे आर्या मेडिकल अॅन्ड जनरल स्टोअर्स हे दुकान आहे. या दुकानातून निट्रावेट हे झोपेचे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याविना व कोणत्याही चिठ्ठीशिवाय विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाकडून या मेडिकल दुकानची तपासणी करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आलेल्या या चौकशीत प्रीस्क्रिप्शनशिवाय बिल न देता झोपेच्या औषधाची विक्री केली जात असल्याचे समोर आले. या मेडिकलमध्ये 5 एमजी निट्रावेटसह अशा 16 प्रकारच्या 1 लाख 40 हजार रुपये किंमतीचा अवैध औषधसाठा आढळून आला. त्यामुळे याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी श्रीकांत पाटील यांच्या फिर्यादीवरुन मेडिकल चालक गणेश माने याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


औषधांची विक्री नेमकी कोणाला केली? 


डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विक्रीस बंदी असलेलं झोपेचं औषध विकणाऱ्या मेडिकल चालकावर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. विशेष म्हणजे कारवाई करण्यात मेडिकलमधून तब्बल 19 हजार नशेच्या गोळ्यांची विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर या औषधांची विक्री नेमकी कोणाला केली, याचे रेकॉर्ड अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून त्या दृष्टीने देखील तपास केला जात आहे. 


सोलापूर येथील औषध वितरकाकडून औषधे खरेदी केली 


पोलिसांनी केलेल्या तपासात उमरगा येथील मेडिकल चालकाने सोलापूर येथील औषध वितरकाकडून औषधे खरेदी केली असल्याचे समोर आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने सोलापूर येथील रेकॉर्ड तपासल्यानंतर त्या ठिकाणी औषधे विक्री झाल्याचे रेकॉर्ड मिळाले. मात्र, उमरगा मेडिकलमधून तब्बल 1 लाख 40 हजार रुपये किमतीच्या सुमारे 19 हजार गोळ्या कोठे विक्री केल्या? याचे कोणतेही रेकॉर्ड मिळाले नाहीत. एवढेच नाही तर कोणत्या डॉक्टरने या गोळ्या सुचवल्या याचीही माहितीही मिळत नाही. त्यामुळे पोलीस तपासात या सर्व गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


मानलं राव पोलिसांना! फक्त झाडाच्या पाल्यावरून लावला एटीएम चोरांचा छडा, पाहा काय आहे प्रकरण?