मुंबई: धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) प्रश्नावर आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक झाली, पण यातून काहीच तोडगा निघाला नसल्याचं समोर आलं आहे. ज्या आरक्षणासाठी धनगर बांधवांचे उपोषण सुरू आहे, त्याविषयावर योग्य चर्चा झाली नसल्याचं आंदोलकांनी म्हटलं आहे. 


आणखी वेळ द्या अशी राज्य सरकारची मागणी आहे. पण आणखी दोन महिन्यानंतर काय होईल असं वाटत नाही. आजच आमच्या मागण्या पूर्ण होईल असं वाटत होतं, पण तसं झालं नाही अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री सकारात्मक आहेत, पण रिझल्ट मिळत नाही असंही आंदोलकांच्या शिष्टमंडळाने म्हटलं. तर आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे राज्य सरकारकडून मागे घेण्यात येणार आहेत.


सरकारने अजून वेळ मागितला


धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिष्टमंडळाची चर्चा झाली. त्यामध्ये आरक्षणावर अभ्यास करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ द्या अशी मागणी राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली. पण आंदोलकांनी त्याला विरोध केला.


आतापर्यंत सरकारने धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर कितीतरी वेळ घेतला, आता आणखी वेळ मागून घेत आहेत. धनगर समूदायाला केंद्रात एसटीचा दर्जा असून राज्यात मात्र तो दिला जात नाही असं आंदोलकांच्या वतीनं प्रतिक्रिया देण्यात आली. 


अहमदनगरच्या चौंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने धनगर समाजाला एसटी संवर्गत समाविष्ट करावं या मागणीसाठी उपोषण आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा सोळावा दिवस आहे.धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.या आंदोलनाची वाढती आक्रमकता लक्षात घेऊन सरकारने आज मुंबईत बैठक बोलावली होती. मात्र आज यावर कोणताही तोडगा निघाला नाही. 


चौंडीतील शिष्टमंडळातील सदस्यांची नावे



  • बाळासाहेब दोडतले, राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत सेना

  • माणिकराव दांगडे, प्रदेशाध्यक्ष यशवंत सेना

  • गोविंद नरवटे, राष्ट्रीय संघटक यशवंत सेना

  • समाधान पाटील, प्रदेश उपाध्यक्ष यशवंत सेना

  • नितीन धायगुडे, सरचिटणीस यशवंत सेना


अण्णासाहेब रुपनवर आणि सुरेश बंडगर अशी उपोषणाला बसणाऱ्यांची नावं आहेत. रुपनवर यांची प्रकृती खालवल्यनेृ 19 तारखेला पुण्याला ससून रुग्णालयात हलवले, आधी त्यांना 15 तारखेला अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर चार दिवसांनी त्यांना पुण्याला हलवण्यात आहे. सुरेश बंडगर यांनी 20 तारखेपासून पाणी देखील सोडले आहे.


ही बातमी वाचा: