मुंबई : ब्रेक द चेनअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी अटीशर्तींसह लॉकडाऊन जाहीर केला. त्यावेळी त्यांनी समाजातल्या गोरगरीब जनतेचा विचार करून त्यांना काही आर्थिक साह्य जाहीर केलं. शिवाय, अशा गरीब गरजूंसाठी शिवभोजन थाळीही मोफत देण्याचा निर्णय घेतला. गरीब मजुरांबद्दल राज्य सरकार अर्थ साह्याचा निर्णय घेतं. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून पेचात अडकलेल्या लोककलावंतांकडे पुन्हा एकदा राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याने संपूर्ण राज्यातल्या कलावंतांमध्ये नाराजी पसरली आहे. 


पहिला लॉकडाऊन गेल्या वर्षी मार्च महिन्यात लागला. त्यानंतर पुढचे अनेक महिने घरी बसण्यात गेले. त्यानंतर डिसेंबर महिन्यापासून काही गोष्टी सुरळीत होऊ लागल्या. पन्नास टक्के उपस्थितीवर सिनेमे सुरू झाले. नाटकं चालू झाली. अनेकांचे व्यवसाय सुरू झाले. मात्र लोककलावंतांना मात्र अद्याप आपली कला दाखवण्याची संधी मिळाली नव्हती. कारण, कला सादर करण्यासाठी हंगामही महत्वाचा असतो. चांगल्या हंगामाची वाट पाहणारा लोककलावंताच्या पदरी या दुसऱ्या कोरोनाच्या लाटेने निराशा लोटली. कारण, कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणच्या वावरावर बंदी आली. त्यामुळे जरा कुठं आता काही तरी सुरू करायची आशा दिसत असतानाच पुन्हा एकदा लॉकडाऊनने लोककलावंतांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. अशात राज्य सरकारने काहीच आर्थिक मदत जाहीर न केल्याने हा लोककलावंत नाराज झाला आहे. 


याबाबत अनेक कलावंतांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत एबीपी माझाशी बोलताना मोहित नारायणगावकर म्हणाले, गेल्या दीड वर्षापासून लोककलावंतांची अवस्था बिकट आहे. काहीच काम चालू नाहीय. त्यामुळे जगायचं कसं हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. मुख्यमंत्र्यांनी समाजातल्या काही घटकांना मदत जाहीर केली आहे. मात्र अशावेळी राज्याची कला जोपासणाऱ्या लोककलावंताचा विसर राज्य सरकारला पडला आहे. सध्या अनेक गरजू लोककलावंत आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. राज्य सरकारला विनंती आहे की त्यांनी आम्हा कलावंतांचा विचार करावा. 


नारायणगावकर यांच्याप्रमाणेच लोककला अभ्यासक गणेश चंदनशिवे यांनीही लोककलावंतांना आर्थिक मदत मिळण्याच्या बाबीला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, लोककलावंतांची अवस्था गेल्या वर्षभरापासून बिकट आहे. हातावर पोट असलेल्या या कलाकारांना बाहेर पडणंही मुश्कील झालं आहे. सरकारने या घटकांचा विचार करायला हवा. असं झालं तरच लोककला टिकेल. 


गेल्या अनेक वर्षापासून नाट्यव्यवसायात कार्यरत असणारे कलाकार संघाचे अध्यक्ष प्रदीप कबरे यांनीही लोककलावंतांना आर्थिक साह्य व्हावं अशी मागणी एक पत्र लिहून केली आहे. या पत्रात नाट्यव्यवसायातल्या इतर घटकांचाही उल्लेख करण्यात आला आहे. यात नाटकात काम करणारे छोटे कलाकार, बुकिंग क्लार्क, नाट्यव्यवस्थापक, रंगमंच कामगार, वाद्यवृंद कलाकार, निवेदक यांचाही उल्लेख त्यांनी आपल्या पत्रात केला आहे. 


राज्य सरकारने जाहीरर केलेला लॉकडाऊन हा 15 दिवसांचा असेल की आणखी वाढेल याबाबतही संभ्रम आहे. तो पंधराच दिवसांचा असेल असं सांगता येत नाही. तो विचार करून सरकारने साहनुभूतीने लोककलावंतांचा विचार करावा अशी मागणी जोर धरते आहे. 


संबंधित बातम्या :


आम्ही लोककलावंत आहोत ही आमची चूक आहे का? रघुवीर खेडकर, मंगला बनसोडे यांना माझा कट्ट्यावर अश्रू अनावर


लोककलावंतांची व्यथा पाहून अनेकांना अश्रू अनावर; 'माझा कट्टा' पाहून कलावंतांच्या मदतीसाठी अनेकजण पुढे सरसावले