पंढरपूर : अजित पवार यांना सध्या काय झालाय माहित नाही पण फारच जोरात सुटलेत आणि त्यांची जीभही घसरत चाललीय, म्हणजे त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याचा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. सिंचन घोटाळा, शिखर बँक प्रकरण यांची चौकशी असताना अजित पवार कशाच्या जीवावर बोलत आहेत, हे कळत नाही असं सांगत सध्या राष्ट्रवादीचे काही मंत्री सुपात तर काही जात्यात आहेत, असं सूचक वक्तव्यही चंद्रकांत पाटलांनी केलं आहे. एकंदरीत पुन्हा एकदा भाजपने सिंचन घोटाळ्याचा ससेमिरा अजित पवार यांच्या मागे लावायच्या हालचाली सुरु केल्याचे संकेतच चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. एकाबाजूला अनिल देशमुख यांची सीबीआयकडून कालच 10 तास चौकशी झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आज अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याची आठवण करून दिली आहे. 


आता मंत्र्यांची पुढे मालिकाच असून कोणत्याही भ्रष्ट मंत्र्याची आता सुटका नसल्याचा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. जरी शरद पवार यांच्यावरील पीएचडी अजून पूर्ण झाली नसली, तरी आता मी अजित पवार यांच्यावरही एम फील करायचा निर्णय घेतला आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. राज्यात साखर कारखाने आजारी झाले की, ते विकत घ्यायचा सपाट पवार कुटुंब करीत असून आता त्यांनी आपल्या कडील कारखान्यांच्या माहितीची श्वेतपत्रिका काढा, असं म्हणत निशाणाही साधला आहे. 


"अजित पवार जास्त गमजा मारू नका, कालचक्र फिरत असतं याची जाणीव ठेवा, असं सांगत आता राज्यात सत्तांतर कसं होईल, कधी होईल हे सर्व तुम्हाला माहीत आहे. मात्र आता जे सत्तांतर होईल ते आमच्या जीवावर होईल असा संकेत दिला आहे. अजित पवार हे सत्तेसाठी हपापले आहेत. म्हणूनच त्यांनी शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपद घेतले होते. सत्ता कोणाची असली तरी यांना उपमुख्यमंत्रीपद हवे असते.", असं म्हणत टोला लगावला आहे. 


"आपल्याला चंपा म्हणणे आपल्या इशाऱ्यानंतर थांबवले होते. पण पुन्हा याचा उल्लेख अजित पवार यांनी केल्याने आम्ही तोंड उघडले, आत अवघड होईल आम्ही तुमच्या मुलांसह सर्वच नेत्यांची नावं बोलू असं सांगितलं. 'हम किसिको टोकते नही, अगर किसने हमे टोका तो, हम छोडते नही' अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी चंपा या वक्तव्यावरून अजित पवार यांना इशारा दिला. निसर्गाच्या कालचक्रात प्रत्येकाला आपण केलेली पापं याच ठिकाणी फेडून जावं लागेल, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. 


ज्या पद्धतीने महत्व नसणाऱ्यांची दारे पुजायचा स्वभाव अजित पवारांचा नाही तर तो शरद पवार यांचा आहे. मात्र सध्या अजित पवार स्वभावाच्या विरुद्ध घरोघरी फिरत असल्याने पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान अवताडे विजयी होणार असल्याचा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.