मुंबई : ज्यांनी लोककला काळजापलीकडे जपली, जोपासली, ते तमाशा कलावंत मंगला बनसोडे आणि रघुवीर खेडकर यांची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी आज एबीपी माझा कट्ट्यावर पाहायला मिळाली. कोरोनाच्या संकटात तमाशा कलावंतांच्या आयुष्याची झालेली परवड, त्यांचं दु:ख या दोघांनी रसिकांसमोर  मांडले. लॉकडाऊनकाळात समाजातील अनेक घटकांना सरकारने मदत केली. मात्र, अद्याप तमाशा कलावंतांना कोणतीही मदत न मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 


ज्या लोककलावंतांना स्टेजवर अनेकदा वन्स मोर दिला जायचा. आज त्यांना एकवेळ जेवणासाठी पडेल ते काम करावं लागत असल्याचे दुःख मंगला बनसोडे यांनी सांगितले. तर मी उपोषण केलं त्यानंतर सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी फोन करुन बोलावून घेतलं. आम्ही तिथं गेल्यानंतर मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही फुल ना फुलाची पाकळी मदत करू असं त्यांनी आश्वासन दिलं. मात्र, त्यानंतर पुन्हा तीन महिने काहीच नाही. त्यानंतर, चित्रपटगृह, नाटकं, लावणीचे कार्यक्रम, आठवडी बाजार, असं सर्वकाही सुरु झालं. मात्र, तमाशा अजूनही बंदच आहे, अशी व्यथा रघुवीर खेकडर यांनी आपली व्यथा मांडली.


तमाशा हा मुख्यत्वेकरुन गावागावातील जत्रा, यात्रांवर चालतो. मात्र, कोरोनामुळे यावर निर्बंध आल्याने तमाशा पूर्णपणे बंद आहे. आम्ही या संदर्भात शरद पवार यांच्याकडे गेलो ते म्हणाले आम्ही मदत केली. पण, ती आमच्यापर्यंत पोहचली नाही. नंतर कळलं की ती संगीत बारीवरील कलाकारांना मिळाली. शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात अशा सर्व राजकीय नात्यांकडे गेलो. मात्र, या सर्वांकडून पाच रुपयेही मदत मिळाली नसल्याचे मंगला बनसोडे म्हणाल्या. या कोरोनामुळे अनेक तमाशे बंद झाले. महराष्ट्रात लहान-मोठे असे शंभराच्यावर तमाशा मंडळे असतील अशी माहिती रघुवीर खेडकर यांनी दिली. तिकीटावरही तमाशा करणेही परवडत नाही. पूर्वी दीड ते दोन हजार प्रेक्षक यायचे मात्र, आता पाचशे ते सहाशे प्रेक्षक येत असल्याचे खेडकर यांनी सांगितले.


मोबाईलमुळे तमाशा मंडळाचे नुकसान
आजकाल मोबाईल, टिव्हीवर सर्व उपलब्ध असल्याने प्रेक्षक प्रत्यक्ष यायला बघत नसल्याची खंत खेडकर यांनी व्यक्त केली. आजकाल युट्युबवर सर्व तमाशा सर्च केला तर सगळ्यांचे तमाशे उपलब्ध होत असल्यानेही प्रेक्षक कमी झाल्याचे खेडकर यांनी सांगितले. लॉकडाऊन काळात तमाशा बंद झाल्याने त्या तीन महिन्यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपये मदत आम्ही सरकारकडे मागितली आहे. पण, ती अद्याप मिळाली नाही. 



पिंजरा चित्रपटामुळे तमाशाची प्रतिमा डागळली


व्ही. शांताराम यांच्या पिंजरा चित्रपटानंतर तमाशाची प्रतिमा डागळली असल्याची खंत तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केली. पिंजरा चित्रपटात एका महिलेमुळे गावातील आदर्श शिक्षक कसा लयाला जातो असं चित्रण केलंय. तेव्हापासून तमाशातील बाई म्हणजे वाईट अशीच प्रतिमा निर्माण झाली. लोकांची तमाशा कलावंताकडे पाहण्याचा दृष्टीकोण पूर्वीसारखा नाही. स्टेजवर डान्स करणाऱ्या मुलींवर लोक वाईट कमेंट करतात. यात समाजाचीही चूक आहे. लॉकडाऊनकाळात अनेकांना सरकारकडून मदत झाली. मात्र, तमाशा कलावंताना अजूनही मदत झाली नाही.