मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी, संभाजीनगर, परभणी, हिंगोलीतील शेतकऱ्यांचे नुकसान
Unseasonal Rain : छत्रपती संभाजीनगर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात बुधवारी झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान केले आहे.
छत्रपती संभाजीनगर : मागील तीन-चार दिवसांपासून मराठवाड्यात (Marathwada) अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. अशात बुधवारी पुन्हा मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडला आहे. जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar), परभणी (Parbhani) आणि हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात बुधवारी झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान केले आहे.
परभणीत जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस
परभणीच्या जिंतुर तालुक्यातील काही भागांना बुधवारी जोरदार अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने मोठा तडाखा दिलाय. जवळपास अर्धा तास जोरदार पाऊस आणि वादळी वारे सुरु असल्याने सावंगी भांबळे गावाच्या परिसरात वादळी वाऱ्यांनी अनेक झाडं उन्मळुन पडली आहेत. सोबतच, काढणीला आलेल्या ज्वारीसह, हरभऱ्याचे नुकसान झाले आहे. तसेच विद्युत खांब देखील कोसळले आहेत.
हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार बुधवारी हिंगोली जिल्ह्यांमध्ये सायंकाळी पाच ते सात वाजताच्या सुमारास जोरदार स्वरूपाच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतातील गहू, हरभरा, ज्वारी यासह फळबागांचे नुकसान झाले. तसेच, संत्रा, मोसंबी, आंबे आणि भाजीपाला वर्णीय पिकांना सुद्धा पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. गहू आणि हरभरा हे पीक सध्या काढणीला आलेले आहेत, अशा अवस्थेत बुधवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगरात पावसाने झोडपून काढले...
हिंगोली आणि परभणीप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाने झोडपून काढले आहेत. बुधवारी संध्याकाळी शहरात अचानक जोरदार पावसाला सुरवात झाली. जून, जुलै महिन्यात ज्याप्रमाणे पाऊस पडतो तसाच मुसळधार पाऊस कोसळताना पाहायला मिळाला. ग्रामीण भागात देखील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या गव्हाचे मोठं नुकसान झाले आहेत.
बळीराजा पुन्हा संकटात....
यापूर्वी कोरड्या दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मागील तीन ते चार वर्षांपासून अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगामात अवकाळी पावसाचा फटका बसतो, तर रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होते. या नैसर्गिक संकटामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न देखील घटत चालले आहेत. यामुळे शेतकरी आत्महत्या सारख्या घटना वाढल्या आहेत. असे असतानाच पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने चारही बाजूने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यातल्या त्यात आता मागील तीन-चार दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा देखील मोठा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसतांना पाहायला मिळत आहे.
गव्हाचं मोठं नुकसान...
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात रब्बी हंगामात गव्हाची लागवड केली जाते. अशात हेच गव्हाचे पीक आता काढणीला आले आहेत. पुढील 10-12 दिवसांत गव्हाची काढणीला सुरवात होईल. काही ठिकाणी गव्हाच्या काढणीला सुरवात देखील झाली आहे. मात्र, अचानक येणाऱ्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका गव्हाच्या पिकांना बसत आहे. काढणीला आलेलं गहू मातीमोल होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज पाहून गहू काढून घेतला पाहिजे.
इतर महत्वाच्या बातम्या :