Marathwada Rain Update : ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर आता सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मराठवाड्यात (Marathwada) मागील पाच दिवसांत 50 मिमी पाऊस झाला असून, यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, असे असलं तरीही अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा कायम आहे. कारण अजूनही अनेक प्रकल्प कोरडेठाक असून, विहिरी देखील आटल्या आहेत.
मराठवाड्यात मागील पाच दिवसांत 50 मि.मी. पाऊस झाला असून, विभागाची वार्षिक सरासरी 679 मि.मी. आहे. सरासरीच्या तुलनेत 454 मि.मी. पाऊस झाला आहे. तर अजूनही 225 मि.मी. पावसाची तूट कायम आहे. पावसाची टक्केवारी पाहिली तर 66.8 पाऊस झाला असून, 34 टक्क्यांची तूट आहे. मागील वर्षी 117 टक्के पाऊस झाला होता. 10 सप्टेंबरपर्यंत 670 मि.मी. पाऊस झाला होता. मराठवाड्यात कमी पावसामुळे 11 मोठ्या प्रकल्पांमध्ये अत्यल्प जलसाठा असल्याचे चित्र आहे. त्यात 6 सप्टेंबरच्या रात्रीपासून विभागात पाऊस सुरू झाला असून, चार जिल्ह्यांतील 10 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली.
कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस
अ.क्र. | जिल्ह्याचे नाव | झालेला पाउस |
1 | औरंगबाद | 362 मि.मी |
2 | जालना | 369 मि.मी |
3 | बीड | 307 मि.मी |
4 | लातूर | 406 मि.मी |
5 | उस्मानाबाद | 335 मि.मी |
6 | नांदेड | 775 मि.मी |
7 | परभणी | 386 मि.मी |
8 | हिंगोली | 582 मि.मी |
एकूण | 454 मि.मी |
पिकांना जीवनदान...
यंदा मान्सून उशिरा आल्याने पेरण्या देखील उशिरा झाल्या आहेत. त्यात जुलै महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाल्यावर ऑगस्ट महिना मात्र कोरडा गेला. त्यामुळे पिकांनी अक्षरशः माना टाकल्या होत्या. तर काही ठिकाणी पिकं करपू लागली होती. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता. अशात मागील चार-पाच दिवसांत झालेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले. खरीपाचे पिकं शेवटच्या टप्प्यात असताना हा पाऊस झाला असल्याने, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. पण, अजूनही विहिरी आणि धरणं भरली नाही. त्यामुळे आगामी काळात आणखी जोरदार पावसाची अपेक्षा आहे. त्यातच आता पावसाचे फक्त 20 दिवस उरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नजरा अजूनही पावसाकडेच लागल्या आहेत.
शेतकरी आत्महत्या वाढल्या...
पावसाने पाठ फिरवल्याने यंदाचे खरीप हातून जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे. मागील तीन-चार वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर आता कोरड्या दुष्काळाचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नापिकी आणि आर्थिक परिस्थितीला कंटाळून मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल उचलत असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील आठ महिन्यात विभागात तब्बल 685 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Rain News : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळजन्य स्थिती, पावसासाठी मुस्लिम बांधवांकडून नमाज पठण