Solapur News : राज्यातील अनेक भागात पावसाने (Rain) दडी मारली आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सोलापुरात (Solapur) देखील सध्या दुष्काळसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं पावसासाठी आज मुस्लिम बांधवातर्फे विशेष नमाज पठण करण्यात आलं. अहले हदिस संघटनेतर्फे सोलापुरातील रंगभवन ईदगाह येथे पावसासाठी या विशेष नमाजचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शेकडो मुस्लिम बांधवानी उपस्थित राहून पावसासाठी प्रार्थना केली.


जेव्हा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होते, तेव्हा असा एकत्रित नमाज अदा केला जातो


मुस्लिम बांधवांच्या या नमाजला 'नमाजे इस्तेस्का' असं म्हटलं जातं. जेव्हा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होते, त्यावेळी खुल्या मैदानात एकत्रित येऊन ही नमाज अदा केली जाते. तसेच क्षमायाचना करत अल्लाहकडे पावसासाठी दुआ केली जाते.


सोलापूर जिल्ह्यात पावसाची ओढ, खरीपाची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर


सोलापूर जिल्ह्यात पावसानं चांगलीच ओढ दिली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. कारण खरीपाची उभी पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. बहुतेक शेतकऱ्यांची पिकं करपू लागली आहेत. मंगळवेढा, सांगोला, बार्शी, अक्कलकोट, दक्षिण आणि उत्तर सोलापूर, मोहोळ या तालुक्यांतील पिकांना पावसाअभावी सर्वाधिक फटका बसला आहे. यंदा जिल्ह्याचे गळीतधान्य, अन्नधान्य आणि कडधान्यांचे उत्पादन घटणार आहे. आता पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. पाऊस नाही, उजनीतून पाणी सोडले जात नाही. त्यामुळं शेतकऱ्यांसमोरील अडचणींचा डोंगर वाढला आहे. 


पुणे जिल्ह्यातून धरणातून उजनी धरणात विसर्ग सुरु


दरम्यान, पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात पुणे जिल्ह्यात पाऊस सुरु झाला आहे. पुणे जिल्ह्यातील चासकमान, वडीवळे, पवना, आंध्रा आणि कासार साई या धरणातून 20 हजार क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. यातच उजनीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू झालेल्या पावसामुळे पाच हजार क्यूसेक विसर्गाने पाणी लवकरच उजनी धरणात येण्यास सुरुवात होणार आहे. अजूनही पुणे जिल्ह्यात पाऊस सुरु  असल्याने उजनी धरणात येणारा विसर्ग वाढू शकणार आहे. सध्या उजनी धरणामध्ये 18 टक्के जिवंत पाणी साठा असून धरणात 73.33 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे.