(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला, मराठवाड्यातील 400 गावात उपोषण; अनेक ठिकाणी नेत्यांना 'गावबंदी'
Maratha Reservation : हिंगोली जिल्ह्यातील 563 गावांपैकी 100 पेक्षा अधिक गावांनी राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपली असून, जरांगे पुन्हा एकदा उपोषणावर बसले आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गावागावात आता उपोषण सुरु झाले आहेत. दरम्यान, मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिकच तापला असून, सुमारे 400 गावात साखळी उपोषणाला सुरवात झाली आहे. तर, अनेक गावात राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे, आगामी काळात मराठा आरक्षण आणखीच तापण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील अनेक गावात, जिल्हा परिषद सर्कल आणि तालुकास्तरीय ठिकाणी साखळी उपोषण करण्यात येत आहे. परभणी जिल्ह्यात 50 गावांमध्ये साखळी उपोषण सुरू करण्यात आले. तर, हिंगोली जिल्ह्यातील 563 गावांपैकी 100 पेक्षा अधिक गावांनी राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, धाराशिव जिल्ह्यात 100 हून अधिक गावांमध्ये साखळी उपोषणास सुरूवात केली आहे. सोबतच, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड जिल्ह्यात देखील अनेकठिकाणी गावागावात उपोषण करण्यात येत आहे.
राजकीय नेत्यांना विरोध...
मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. त्यामुळे मराठा समाजाकडून आता वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यात येत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर अनेक गावात राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गावात कोणत्याही राजकीय नेत्यांना प्रवेश दिले जाणार नसल्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. तसेच, गावात राजकीय नेते किंवा लोकप्रतिनिधी आल्यास त्यांना विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा आता ग्रामीण भागात देखील तापतांना दिसत आहे.
जरांगे आजपासून आमरण उपोषण करणार...
सरकारला देण्यात आलेली 40 दिवसांची मुदत संपल्याने मनोज जरांगे यांनी पुन्हा जालना येथील आंतरवाली सराटी गावात उपोषणाला सुरवात केली आहे. बुधवारपासून आपण आमरण उपोषण सुरु केल्याची घोषणा देखील जरांगे यांनी केली होती. मात्र, छत्रपती संभाजीराजे यांनी जरांगे यांची भेट घेऊन उपोषणादरम्यान पाणी पिण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे संभाजीराजे यांचे मान राखत आपण पहिल्या दिवशी पाणी घेणार असून, उद्यापासून म्हणजेच आजपासून जरांगे आमरण उपोषण करणार असल्याचो घोषणा जरांगे यांनी केली आहे. त्यामुळे, आज देखील सरकारकडून जरांगे यांच्याशी संपर्क केले जाण्याची शक्यता आहे. तर, त्यानंतर जरांगे यांची भूमिका महत्वाची असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: