BRS Meeting In Chhatrapati Sambhaji Nagar: राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडत असतानाच, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांच्या भारत राष्ट्र समिती म्हणजेच बीआरएस (BRS) पक्षाची मराठवाड्याची (Marathwada) राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) सभा होत आहे. 24 एप्रिल रोजी या सभेचं आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान या सभेसाठी पोलिसांनी परवानगी देखील दिली आहे. मात्र सभेसाठी बीआरएसला हवं असलेलं मैदान मात्र बदलण्यात आले आहे. यापूर्वी आमखास मैदानावर सभा घेण्याचं पक्षाचं नियोजन होते, मात्र पोलिसांनी आयोजकांना जागा बद्दलण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार आता सभा बीड बायपास येथील जबिंदा मैदानावर होणार आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाला राष्ट्रीय पातळीवर वाढवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी त्यांनी महाराष्ट्र आणि त्यातल्या त्यात मराठवाड्याची निवड केली आहे. यापूर्वी नांदेड जिल्ह्यात बीआरएसच्या दोन सभा पार पडल्या असून, तिसरी सभा छत्रपती संभाजीनगर शहरात होत आहे. 24 एप्रिल रोजी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील आमखास मैदानावर सभा घेण्यासाठी नियोजन देखील करण्यात आले होते. मात्र या परिसरात ईदच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेता, पोलिसांकडून जागा बदलण्याच्या सूचना आयोजकांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार बुधवारी पोलीस आणि बीआरएसच्या स्थानिक नेत्यांनी बीड बायपासवरील जबिंदा मैदानाची पाहणी केली. तर या मैदानासाठी पोलिसांकडून देखील परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे 24 एप्रिलला बीड बायपासवरील जबिंदा मैदानातच बीआरएसची सभा होणार आहे. विशेष म्हणजे या सभेला परवानगी देताना पोलिसांनी 16 अटी घातल्या आहेत.
वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांचा प्रवेश
छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेण्यापूर्वी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पक्षातील अनेक महत्त्वाचे नेते बीआरएसचे गळाला लागले आहे. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव, राष्ट्रवादीचे प्रदीप सोळुंके, कदीर मौलाना, अण्णासाहेब माने, संतोष माने, फिरोज पटेल, अभय पाटील चिकटगावकर, जयाजी सूर्यवंशी यासह अनेक नेते बीआरएसमध्ये सहभागी झाले आहे. सोबतच 24 एप्रिलच्या सभेत देखील शेकडो कार्यकर्ते बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात महत्त्वाचं शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्ष वाढीसाठी के सी आर यांनी प्रयत्न सुरू केले आहे. मात्र त्यांना यात कितपत यश येतं हे येणारा काळच सांगेल.
सर्व निवडणूक लढवणार!
बीआरएस पक्षाने राज्याच्या राजकारणात एन्ट्री करताच अनेक महत्त्वाच्या नेत्यांना पक्षात घेण्यासाठी हालचाली सुरू केले आहे. आता दुसरीकडे नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमधील महत्वाचे नेते बीआरएसमध्ये दाखल होत आहे. दरम्यान राज्यात होणाऱ्या आगामी सर्वच निवडणुका बीआरएसकडून लढवल्या जाणार आहे. त्यापूर्वी माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक यांना फोकस करून प्रवेश दिला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
अखेर छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या बीआरएस पक्षाच्या सभेचं ठिकाण ठरलं; असं असणार नियोजन