खंडपीठाचा दणका अन् छ. संभाजीनगर महानगरपालिका लागली कामाला, अतिक्रमणविरोधात जोरदार कारवाई
Chhatrapati Sambhaji Nagar : बेकायदेशीर बांधकाम आणि अतिक्रमण महानगरपालिका पथकाने काढून घेतले आहेत.
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या (Chhatrapati Sambhaji Nagar Bench) दणक्यानंतर महानगरपालिका (Municipal Corporation) कामाला लागली आहे. महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागाने शहरातील अनेक भागातील अतिक्रमण काढून त्यावर जेसीबी फिरवला आहे. शहरातील हडको, टीव्ही सेंटर, कॅनॉट परिसरातील बेकायदेशीर बांधकाम आणि अतिक्रमण महानगरपालिका पथकाने काढून घेतले आहेत. सोबतच रस्त्यावर लावण्यात आलेल्या गाड्या देखील काढण्यात आल्या आहेत.
महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, स्वामी विवेकानंद नगर गार्डन समोरील एन-13 परिसरात अतिक्रमण पथकाने नागरिकांचे मालमत्तेचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना सूचना देऊन त्यांना अतिक्रमित जागेची मार्किंग करून दिली होती. तसेच अतिक्रमणामध्ये रसवंती गृह, पंक्चरचे दुकान, दहा बाय दहा बाय पंधराचे कंपाउंड वॉल आणि लोखंडी जीने काढणे बाबत सूचना देण्यात आल्या आहेत. यानंतर सदर पथकाने महानगरपालिकेच्या मालकीच्या टीव्ही सेंटर मार्केट परिसरातील हॉटेल स्वराज्यच्या बाजूला ठेवण्यात आलेल्या दोन लोखंडी टपऱ्या जप्त करण्यात आल्या.
अन् फुटपाथ मोकळा झाला
सोबतच कॅनॉट परिसरातील एकूण 13 हातगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.या परिसरातील उद्यानाच्या बाजूला असलेला फुटपाथ मोकळा करण्यात आला. याठिकाणी असलेले सर्व अतिक्रमणे काढण्यात आली. यावेळी अतिक्रमण धारकांनी पथकाशी मोठ्या प्रमाणावर वाद घातला. परंतु पथक प्रमुख वसंत भोये यांनी यास न जुमानता कारवाई सुरू ठेवली यामुळे फुटपाथ मोकळा झाला आहे.
वाहनांवर कारवाई...
हडको टीव्ही सेंटर परिसरातील तीन रस्त्यावरचे शेड काढण्यात आले आहेत. दोन चारचाकी मोठ्या बसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. एन-9 परिसरातील बळीराम पाटील चौक येथे दोन मिनी बस फुटपाथवर मागील दहा दिवसापासून उभ्या होत्या. या गाड्यांचे फोटो काढून त्यांचा मालकांना मोबाईलवर सूचना दिल्या जात होत्या. तरी देखील हे वाहनचालक महापालिका प्रशासनाला जुमानत नसल्याने आज यांच्याविरुद्ध कारवाई करून आठ हजार रुपये दंड भरून घेण्यात आला.
कारवाईला विरोध...
दरम्यान टीव्ही सेंटर मार्केट परिसरात कारवाई केली जात असताना, येथील काही लोकांनी पथकाशी हुज्जत घातली. तर एका व्यक्तीने माझे रस्त्यावरचे अतिक्रमण काढू नका असा दम दिला. मात्र पथकाने झालेले अतिक्रमण काढण्याची भूमिका घेतली. दरम्यान परिसरातील नागरिकांनी देखील त्याची समजूत काढून,होणारे काम चांगले असून सहकार्य करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर विरोध करणाऱ्या व्यक्तीची भूमिका बदलली आणि त्यानंतर पथकाने कारवाई केली.
इतर महत्वाच्या बातम्या :