Maha Vikas Aghadi Vajramuth Sabha : छत्रपती संभाजीनगरमधील महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला नाना पटोलेंची ऐनवेळी दांडी!
Maha Vikas Aghadi Vajramuth Sabha : अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला काही मिनिटांचा अवधी असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर राहणार आहेत.
Maha Vikas Aghadi Vajramuth Sabha : अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला काही मिनिटांचा अवधी असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर राहणार आहेत. प्रकृती ठिक नसल्याने ते उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. मात्र, नाना पटोलेंनी निवडलेल्या टायमिंगमुळे राजकीय भूवया उंचावल्या आहेत. दरम्यान, सभेच्या ठिकाणी कार्यकर्ते जमायला सुरवात झाली असून, कार्यकर्त्यांकडून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळत आहे. तर शेतकरी, अवकाळी पाऊस, नुकसान भरपाई, पीकविमा योजनाबाबत सरकार काहीच बोलत नसल्याने, आजच्या सभेत या विषयाचा समाचार घ्यावा अशी या अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
सावरकर मुद्यावरून मतभेद?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सातत्याने माफी मागण्यास किंवा घाबरण्यास मी सावरकर नाही, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्यात एकी होत चाललेल्या महाविकास आघाडीत मतभेद झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मालेगावमधील जाहीर सभेत राहुल गांधी यांनी सावकरांचा अपमान करू नये, असे सुनावले होते. यानंतरही शरद पवार यांनीही या वादात प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांना सबुरीचा सल्ला दिला होता. त्यामुळे काँग्रेसची चांगलीच अडचण झाली आहे. आता नेमक्या याच मुद्यावरून नाना पटोले यांनी नाराज होऊन दांडी मारली की खरोखरच सभेला न येण्याइतपत त्यांची प्रकृती ठिक नाही, याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी भविष्यात सावरकरांवर जाहीर टीका करणार नसल्याचे म्हटले आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात गौरव यात्रेला परवानगी
दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर शहरात महाविकास आघाडीची एकत्र सभा होत असतानाच दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून सावरकर गौरव यात्रा (Savarkar Gaurav Yatra) काढण्यात येत आहे. मात्र पोलिसांकडून या यात्रेला परवानगी देण्यात आली नव्हती. आज सकाळी अखेर पोलिसांनी या यात्रेला परवानगी दिली आहे. परवानगी देताना पोलिसांकडून सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे सावरकर गौरव यात्रा काढताना भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेला पोलिसांकडून देण्यात आलेल्या अटी आणि शर्ती पाळाव्या लागणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज (2 एप्रिल) ठाणे शहरातून वीर सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ झाला. भाजप आणि शिंदे गटाच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने गेल्या महिन्यात सावरकरांच्या दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या त्यांच्यावरील वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सावरकर गौरव यात्रा काढण्याची घोषणा केली होती. यात्रेला प्रारंभ करताना मुख्यमंत्री म्हणाले की, सावरकर गौरव यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात पुढील आठवडाभर प्रत्येक गावात, शहरात ही यात्रा निघेल. सावकरांचा इतिहास घराघरात पोहोचवला जाईल. स्वातंत्र्यविरांचा अपमान हा देशाचा अपमान असून त्यामुळे राहुल गांधींचा मी धिक्कार करतो.
इतर महत्वाच्या बातम्या