Chhatrapati Sambhaji Nagar  : एकीकडे मुंबईतील अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणावरून (Abhishek Ghosalkar Firing Case ) राजकीय वातावरण तापले असतानाच, दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Nagar City) क्रांती चौकात महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजपचे (BJP) कार्यकर्ते समोरासमोर आल्याने गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पोलिसांकडून दोन्ही गटाच्या कार्यकर्ते यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. अचानकपणे दोन्ही नेते आमने-सामने आल्याने मोठा गोंधळ उडाला आणि यामुळे वाहतूक कोंडी देळील झाल्याचे पाहायला मिळत आहे. 


राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपकडून शहरातील क्रांती चौकात आंदोलन करण्यात येत होते. याचवेळी महाविकास आघाडीच्या वतीने देखील याच ठिकाणी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याचा आरोप करत आंदोलन केले जात होते. मात्र, दोन्ही गटाचे कार्यकर्ते अचानक समोरासमोर आल्याने गोंधळ उडाला आहे. आता पोलिसांकडून दोन्ही गटाच्या कार्यकर्ते यांना बाजूला करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. 


नेमकं काय घडलं?


छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये भाजपच्या वतीने राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शहरातील क्रांती चौकात आंदोलन सुरू होते. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वतीने राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न विचारण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. शहरातील क्रांती चौकात एकाच ठिकाणी दोन वेगवेगळे आंदोलन असल्यामुळे दोन्ही आंदोलनकर्ते एकमेकांसमोर आले. दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या. भाजपकडून उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या, तर महाविकास आघाडीकडून देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी दोन्ही गट एकमेकांसमोर आले, त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत काही जणांना ताब्यात घेतले. मात्र, काही काळ क्रांतीचौकामध्ये तणावाचं वातावरण होतं.


पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पांगवले...


शहरातील क्रांती चौकात महाविकास आघाडी आणि भाजपचे कार्यकर्ते अचानक समोरासमोर आल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे या दोन्ही आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आधीपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे दोन्ही गटाकडून घोषणाबाजी सुरु होताच पोलीस अलर्ट झाले. दोन्ही गट एकमेकांच्या अंगावर जाण्यापूर्वीच पोलिसांनी एक फळी तयार करत मध्येच उभे राहिले. तसेच दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना जागीच रोखून धरले. गोंधळ अधिकच वाढत असल्याचे पाहून शेवटी पोलिसांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरवात केली. त्यामुळे शेवटी दोन्ही गट बाजूला झाले आणि आंदोलन देखील संपले.


इतर महत्वाच्या बातम्या : 


गृहमंत्र्यांच्या नाकर्तेपणाची किंमत सर्वसामान्य जनतेने का चुकवावी?; सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल