Chhatrapati Sambhaji Nagar Accident : छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास परिसरातल्या बाळापूर फाट्यावर हायवा आणि दुचाकीचा भीषण अपघात (Accident) झालाय. या अपघातात दुचाकीवर असणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीय. अपघातात मृत असलेले तिघेही बहिण-भाऊ असल्याची माहिती समोर येत आहे. अपघाताची माहिती मिळतात पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले आहेत.  तर, मयत झालेले तिघेजण परभणी जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, ते मागील काही दिवसांपासून ते सातारा परिसरातील शिवछत्रपतीनगर भागात राहत होते. प्रवीण अंभोरे, प्रतिभा अंभोरे आणि लखन अंभोरे अशी मृत बहीण भावाची ( Sister Brother) नावं आहेत. 


पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास बीड बायपासवरील बाळापूर फाटा परिसरातील पाटीलवाडा हॉटेल समोर आपल्या दुचाकीवरून अंभोरे बहिण भाऊ प्रवास करत होते. याचवेळी दोन हायवांमध्ये ओव्हरटेक करण्याची स्पर्धा सुरु होती. याच स्पर्धेच्या नादात दोन्ही पैकी एका हायवा चालकाने अंभोरे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. थेट अंगावरून हायवा गेल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे या अपघातानंतर हायवा चालक घटनास्थळावरून गाडीसह फरार झाला असल्याची माहिती उपस्थितीत नागरिकांनी दिली आहे. तर, तिनही मृतदेह शासकीय घाटी रूग्णालयात (Government Hospital) पाठवले आहे. 


तिघेही बहीण भाऊ परीक्षा देण्यासाठी निघाले होते...


अपघातात मृत झालेले तिघेही बहीण-भाऊ आहेत. तिघांचे वय वीस ते पंचवीस वर्षे असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर घटनास्थळी वन विभागाच्या परीक्षेचे हॉलतिकीट आढळून आले आहेत. त्यामुळे तिघेही बहीण भाऊ परीक्षा देण्यासाठी जात असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. पोलिसांकडून त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे. तर अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. 


पोलीस घटनास्थळी... 


छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास परिसरातल्या बाळापूर फाट्यावर हायवा आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळताच चिकलठाणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी मृतदेह घाटी रुग्णालयात पाठवले आहेत. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडून अपघात करणाऱ्या हायवा ट्रकचा शोध घेतला जात आहे. यासाठी पोलीस सीसीटीव्हीची पाहणी करत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Ratnagiri Bus Fire : मोठा अनर्थ टळला! चालत्या बसने घेतला पेट; तरुणाचं प्रसंगावधान, 19 प्रवासी बचावले