Abhishek Ghosalkar Firing Case : मुंबईतील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असून, यावर आता शरद पवार गटाच्या (Sharad Pawar Group)  खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची प्रतिक्रिया आली आहे. 'गृहमंत्र्यांच्या नाकर्तेपणाची किंमत सर्वसामान्य जनतेने का चुकवावी? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. तसेच याबाबत ट्वीट करत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर गंभीर आरोप देखील केला आहे. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांनी काही वेळाने हा ट्वीट डिलीट देखील केला आहे. 


सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “मुंबईतील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची सोशल मिडियावर लाईव्ह असताना गोळीबार करुन हत्या करण्यात आली. नेत्यांवर गोळीबार होण्याची ही महिन्यातील दुसरी वेळ. एकीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राजरोसपणे गुंडांना भेटत असून, त्यांना राजाश्रय मिळत असल्याचे समोर येत आहे. तर, दुसरीकडे अशा पद्धतीने गोळीबाराच्या घटना घडत आहेत. या राज्यात भाजपा आमदार गणपत गायकवाड म्हणाले त्याप्रमाणे अधिकृतपणे 'गुंडाराज' सुरु झाले आहे का? नेत्यांचे दिवसाढवळ्या खुन पडत आहेत. याचाच अर्थ राज्याच्या गृहमंत्री महोदयांचे त्यांच्या स्वतःच्या खात्याकडे अजिबात लक्ष नाही. त्यांच्या या दुर्लक्षामुळे कायदा सुव्यवस्था पुर्णतः ढासळली आहे. गृहमंत्र्यांच्या नाकर्तेपणाची किंमत सर्वसामान्य जनतेने का चुकवावी?, असे सुप्रिया सुळे म्हणाल्यात.




मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राजरोसपणे गुंडांना भेटतायत...


मागील काही दिवसांपासून सत्ताधारी नेत्यांचे गुंडांसोबत झालेल्या भेटीचे फोटो समोर येत आहेत. ज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे देखील फोटो समोर आले होते. यावरूनच सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. "मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राजरोसपणे गुंडांना भेटत असून, त्यांना राजाश्रय मिळत असल्याचे समोर येत असल्याचे सुळे यांनी म्हटले आहेत. 


आव्हाडांची सरकारवर टीका...


अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. "महाराष्ट्राचा बिहार झाला असे म्हणण्यात आता काहीच अर्थ उरला नाही. कारण, महाराष्ट्राने बिहारला खूप मागे सोडलं आहे. गुंडांनी जणू काही महाराष्ट्र आपल्या मुठीत बंदिस्त करून टाकला आहे. हतबल सरकार उघड्या डोळ्यांनी सारं काही पाहतंय. पोलिसांची दहशतच संपली आहे. पोलीस दलात होणाऱ्या हस्तक्षेपामुळे पोलिसांनाही मर्यादा येत आहेत. पोलिसांवर फक्त विरोधकांना संपवण्याची जबाबदारी आहे. कायदा आणि सुव्यवस्था गेली खड्ड्यात! दुर्देवं आहे, महाराष्ट्राचे! इतक्या घटना घडूनही सरकारला लाज कशी वाटत नाही. जनता हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघतेय, जनतेमधील रोष वाढतोय. पण, लोकांचा जीव जाणे, याला सरकारच जबाबदार आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे. परवा कल्याण, आज मुंबई... अजून काय माहित किती घटना घडणार आहेत? कधी पुणे, कधी ठाणे तर कधी मुंबई खुनांचा थरार सुरूच असल्याचे" आव्हाड म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


राज्यातील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावा; संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल