छत्रपती संभाजीनगर : देशभरात दिवाळी (Diwali) मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच दुसरीकडे, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरात वेगवेगळ्या आगीच्या (Fire) घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  या घटनांमध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. दरम्यान, आगीच्या घटनेत 15 लाखांचे नुकसान झाले आहे. तर, काही फायर कॉलनंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याचे पाहायला मिळाले. 


लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री दहाच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध ठिकाणी आग लागल्याच्या तब्बल दहा घटना घडल्या. या सर्व आगीच्या घटना किरकोळ असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन अग्निशमन विभागाला त्याबाबत सूचना दिल्याने सुदैवाने मोठी हानी टळली. या घटनांमध्ये कोणालाही दुखापत झालेली नसल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख शिवाजी झन झनझन यांनी दिली.


पहिल्या दिवशी शहरात दहा घटनांमध्ये आगीमुळे 15 लाखांचे नुकसान 


लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात मोठ्या उत्साहात नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. मात्र, यामुळे काही ठिकाणी आगीच्या घटना देखील समोर आल्या आहेत. लक्ष्मीपूजनानिमित्त उडवल्या गेलेल्या फटाक्यांमुळे अनेक ठिकाणी कचरा पेटल्याने आग लागल्याचे समोर आले. शहरात एकूण 10 ठिकाणी आगीच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, या सर्व आगीच्या घटना किरकोळ असून यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. दिवाळीच्या पहिल्या दिवशी शहरात दहा घटनांमध्ये आगीमुळे 15 लाखांचे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कुठेही जीवितहानी झालेली नाही. 


कोठे कोठे लागली आग? 


शहरात लगलेल्या आगीच्या घटनांमध्ये दिवाण देवडी, उस्मानपुरा, सातारा परिसर नक्षत्र वाडी पानचक्की परिसर, चिकलठाणा परिसर या ठिकाणी आग लागली. नक्षत्र वाडीतील एका एका सोसायटीतील सहाव्या मजल्यावर आग लागली होती. यामध्ये संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. छत्रपतीनगरात अय्यप्पा मंदिरासमोरील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये एका वर्गखोलीतून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याने नागरिकांनी अग्निशमन विभागाला कळविले. रॉकेट खोलीत घुसल्याने शैक्षणिक साहित्याला आग लागली. पण ती वेळीच नियंत्रणात आली.


काळजी घ्यावी...


दिवाळी निमित्ताने दोन-तीन दिवस नागरिक फटाके फोडत असतात. त्यामुळे या काळात नागरिकांनी फटाके फोडण्याचा आनंद घेतानाच काळजी घेणं देखील महत्वाचे आहे. दिवाळीत फटाके फोडत असतांना बोटाला आणि हाताला सर्वात जास्त इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजी घेतली पाहिजे. तसेच डोळ्याला इजा होऊ नयेत म्हणून फटाके फोडताना चष्मा घातला पाहिजे. लहान मुलांनी पालकांच्या देखरेखीखाली फटाके फोडावेत. तसेच, हातात फटाके फोडण्याचा स्टंटबाजी करण्याचे टाळावे. महत्वाचे म्हणजे फटाके फोडताना जाड सुती कपडे घालावे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


नाशिकच्या एमजीरोड बाजारपेठेत अग्नितांडव, 5 ते 6 दुकानं जळून खाक, मध्यरात्रीची घटना