Maharashtra Nashik News: नाशिकच्या (Nashik News) गजबजलेले ठिकाण असलेल्या एमजी रोड (MG Road) परिसरात मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीनं पाच ते सहा दुकानं जळून खाक झाली. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. 


एकीकडे सर्वत्र दिवाळीचा जल्लोष सुरू असून नाशिकमध्ये देखील उत्साहाचं वातावरण आहे. शहरातील एमजी रोड, मेनरोड परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, काल मध्यरात्रीच्या सुमारास एमजी रोडवर भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत सुमारे 5 ते 6 दुकानं भस्मसात झाल्याची भीती व्यक्त होत आहे. उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या बंबांद्वारे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. 


शहरातील एमजी रोडवरील रेडक्रॉस सिग्नलजवळ वर्धमान शोरूमला रात्री 11 वाजेच्या सुमारास आग लागली. काही वेळेतच आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे या दुकानाच्या लगतच्या बुक डेपो, संगीत विद्यालय यासह आजूबाजूच्या अन्य 5 ते 6 दुकानांना आगीची मोठ्या प्रमाणावर झळ बसली. या सर्व दुकानांत दिवाळीचे साहित्य उपलब्ध असल्याने आगीच्या घटनेत अनेक दुकानातील कोट्यावधी रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाचे जवळपास 15 बंब घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. फटाक्यांमुळे ही आग लागल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, मात्र नेमकं कारणं कळू शकलेले नाही.